१५. आदरणीय तिरंगा
आज तुला पत्र लिहिते, " तिरंगा " आपला झेंडा. सगळयात आधी तुला ७४ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ७५ व्या नव्या कोऱ्या वर्षात स्वागत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आज जागो जागी साजरा होत असेल. तू या स्वातंत्र्याचे प्रतीक कुणाच्या छातीवर, कोणाच्या खांद्यावर, कोणाच्या काठीवर, कोणाच्या गाडीवर तर दुकानाच्या फळी वर असशीलच. तुला आज थोडे वेगळे वाटते का रे ? म्हणजे पंचाहत्तर वर्षांपूर्वीचे स्वातंत्र्य आणि आजचे स्वातंत्र्य. तेव्हाचा लोकांचा दृष्टिकोन आणि आताचा. पिंजऱ्यातून बाहेर पडण्याचा आनंद. परिस्थिती तेव्हा ही बिकट होती आता ही होती. तेव्हा माणसापासून माणसाला स्वातंत्र्य मिळाले होते. आज दूर राहून पुन्हा एक होण्यात ते दिसते. बलिदान तेव्हा ही दिले; आज दिले. एक दोन नाही लाखोंनी. आजचा पाऊस स्वातंत्र्यासोबत काही बंधने घेऊन पडतोय. दऱ्या खोऱ्यातून आज ही वारा वाहतो, आज त्याला श्वासांची किंमत आली आहे. हिमालयाच्या टोकावर आज ही तू दिसतोस. पण शाळेच्या पटांगणावर " जय हिंद " चा ...