१९. प्रिय पुस्तक
प्रिय पुस्तक ... शाळा आणि गणवेश सोबत होता तेव्हा सतत तुझी सोबत असायची. तेव्हा पाठीवरचे ओझे, परीक्षेचे वेळापत्रक आणि गृहपाठ इतकं काय ते आपलं औपचारिकतेच नातं होतं. तुझ्यात डोकावताना एक तर तोंड उघडायचे ते पाठांतर करण्यासाठी किंवा जांभई देण्यासाठी. ते विश्व निराळं होतं. जवळ असून ही आपल्यात थोडा दुरावा होता. शब्द होते पण त्याची रत्ने वाटली नाहीत. पान होती वेगळी पण वेगळेपण कळलं नाही. पुस्तकांचे रकाने होते पण पुस्तक फारशी गर्दी करून राहिली नाहीत. आता का तसे होत नाही. तुझ्यात डोकावताना आता जांभई कधी तरीच येते. पाठांतराची गरज लागत नाही. वेळापत्रक नसलेल्या परीक्षेसाठी तुला वाचते रोज... पाठीवरचे ओझे तेव्हा वाटले पण ते कधी मनावर आले कळलं नाही आणि त्याच मनावरचं आपलंच एक अपेक्षांचं गाठोडं थोडा वेळ का होईना बाजूला ठेवून तुला वाचते. नंतर ते गाठोडं ही हलकं वाटायला लागतं. तेव्हा आपलं औपचारिकतेच नातं असं अचानक कसं बदललं. याचा विचार अजून ही मी करते. शब्द म्हणजे जमिनीवर पडलेली लहान मोठे दगड असतात. कोणी तुडवुन पुढे जातो. कोण...