२४. कटिंग चाय
कटिंग चाय... कोणीतरी हवं ना यार ... आपलं सगळं सगळं ऐकून घ्यायला. असा प्रत्येकाचा एक जवळचा मित्र असतो किंवा मैत्रीण असते. कधी ती व्यक्ती असते तर कधी ती एखादी गोष्ट ... एखादी वस्तू ही असू शकते. किती वेगवेगळी माणसे... वेगवेगळे स्वभाव... वेगवेगळे प्रसंग... यांचं हसणं, बोलणं, रडणं,भांडणं सगळं सगळं अगदी कान देऊन ऐकत असते. तसाच एक मित्र तिथेच टेबलावर मधोमध असतो. ऐकतो सगळं ... टॉप सिक्रेट, कोणाची काळजी, कोणाचे प्रॉब्लेम, कोणाचे यश, अपयश. उकळून, गाळून, फिल्टर होऊन इथे असा टेबलावर येऊन बसतो. इतकं सगळं ऐकून घेतल्यावर आज मला ही काही सांगायचे आहे अस काही तरी तो म्हणू लागतो. माझ्या अवती भवतीच्या चहाच्या गप्पा ... त्याच्याकडे कान असतो पण आज माझ्यासाठी कान होणार का ? अस टेबलवर एक पाच मिनिटं ठेवलेल्या चहाचे हे आगळे वेगळे मागणे मी मान्य करते आणि त्याची माझी झालेली चाय चर्चा. दिवसाची सुरुवात कोणाची सूर्यप्रकाश पाहून होते कोणाची मोबाईल पाहून, घड्याळ पाहून तर कोणाची टेबलावरचा चहा पाहून. सूर्योदय, सूर्यास्त दिवसातून दोन वेळा. कधी दिवसातून तीनदा, औषधांची वेळ कशी असते ना, तस...