२५. मोत्यांची माळ
रस्त्याने गुलाबी झग्यातली ' ती ' कडेने चालली होती. तिच्या गुलाबी झग्यावर उठून दिसणारी एक मोत्यांची माळ. रंगीत मोत्यांची. वेगवेगळ्या रंगांची. कोणी तिर्हाईत शेजारून गेला आणि झटक्यात ती माळ ओढली. तुटली. निसटली. सगळे रंग आणि मोती रस्त्यात पसरले. मौल्यवान नव्हती ती, इतके कळल्यावर ते इसम तिकडून पळाले. धागा हातात घेऊन ती रस्त्यावरचा पसारा पाहत होती. मोती मात्र गेले दूर दूर. सगळेच पुन्हा मिळणार नाही, जशी आधी होती तशीच माळ पुन्हा होणार नाही. हरवण्याच्या भीतीने उचलण्याचे ही लक्षात नाही आले. बराच वेळ त्याचा धागा तिच्या हातात होता. दुरवर पडलेला एक निळा मोती कोणाच्या तरी पायाशी आला. पुढे वेगवेगळ्या रंगाना वेचत बरेच मोती त्याने ओंजळीत एकत्र केले. शेवटचा मोती उचलताना तिच्या हातात असलेला धागा दिसला आणि तिच्याकडून तो धागा घेण्याच्या ऐवजी तिला सगळे मोती दिले. पुन्हा माळ तयार झाली. मोती सगळे तेच होते, रंग ही; पण यावेळी रचना वेगळी होती. आयुष्याचं ही असंच काही तरी असेल... नाही का ? आपल्याकडे ही असतात की रंगीत मोती... काही शोभा वाढवतात. काही त्यांचे वेगळे वलय करतात. ...