१४. आईला पत्र
तीर्थरूप आई, आज खूप दिवसानी तुला पत्र लिहिते. लहानपणी शाळेत " माझी आई " वर लिहिलेल्या दहा ओळीवर उरकाव इतके सैल हे नातं नाही. त्याची पकड चोवीस, पंचवीसच्या वयात असलेल्या मुलीला बऱ्याच अंशी कळते. कितीही ठरवलं तरी मी सगळ्यांच गोष्टी सांगणं कधी कधी खरंच क्षमतेपेक्षा जास्त मोठा दगड उचलल्यासारखं वाटतं. कधीतरी चिडचिड, कधी होणारी धांदल, कधी कारण नसताना केलेल्या छोट्या छोट्या लढाया. एवढं करून ही त्यावर मायेची फुंकर घालून विजयी तूच होते. कधी कधी प्रश्न ही पडतो. न सांगता सगळंच कस तू मनातलं ओळखते. कधी ओळखून ही काहीच माहीत नसल्याचे भासवतेस. हट्ट केला नसेन कधी पण एकदा कशाची इच्छा बोलून दाखवली की ती पूर्ण करण्यासाठी खटपट करतेस. मी तुझ्या मायेच्या कक्षेतून थोडी दूर गेली की तुझी ही चलबिचल होते. मागे पडत होते तेव्हा तू ही माझ्यासाठी मागे आलीस. पुढे जाण्याचा आग्रह केला नाहीस. पण त्यात ही प्रेम होते. एवढं सगळं कसं जमवतेस ? विचारल्यावर वेळ आली की जमते सगळं. अस ही म्हणते. ती वेळ आज आली आहे. जमवलं पाहिजे ही इच्छा आणि शक्ती दोन्ही तुझ्यामुळेच. जग किती ही मोठं असलं तरी त्यात त...