२६. जत्रा
जत्रा... जेव्हा जेव्हा आपण तिथे जातो ना, तेव्हा असते तिथे खूप सारी गर्दी, असंख्य चेहरे, वेगवेगळे आवाज, जितके जातो पुढे तितके कळत जाते आपले एकटेपण. पदोपदी मिळत जाते अशी अनोळखी जत्रा आणि त्यात ओळखीचा हात शोधणारे एकटे आपण. आपणच जमवलेली चार माणसे सोबत ही असतात तरी वाटतो आपला एकट्याचा प्रवास. लहानपणीची ती गावातली जत्रा. तिथली वेगवेगळी खेळणी आणि दुकानांची गर्दी, दिव्यांचा झगमगाट, तिथला उत्साह. घरून निघताना आपण पकडलेला हात माघारी येईपर्यंत असतोच सोबत. तेव्हाची ती घट्ट पकडलेली मूठ सुटणार नाही याच भरवश्यावर पुन्हा नव्या जत्रेत जाण्याचे आपण धाडस करतो. अशा वेळी न कळत सुटते आधीची घट्ट पकड आणि तो ओळखीचा हात. मग अनोळखी जत्रेत शोधत फिरतो आपण ओळखीचा हात. जत्रा अनोळखी असते. जागा अनोळखी. अशा अनोळखी ठिकाणी आपण ओळखीची ऊब शोधू लागतो. ती शोधण्याची आपली धडपड आणि आपला केविलवाणा प्रवास. मिळालाच एखादा ओळखीचा हात तरी ओळखीची ऊब मिळेलच असे नाही. तिथे असतात सभोवती कुजबुजणारे असंख्य आवाज आणि आकर्षक दुकाने. तिथे जेव्हा पाहतो आजूबाजूला तेव्हा दिसते काही जगावेगळे, काही निराळे. ल...