२५. मोत्यांची माळ
रस्त्याने गुलाबी झग्यातली ' ती ' कडेने चालली होती. तिच्या गुलाबी झग्यावर उठून दिसणारी एक मोत्यांची माळ. रंगीत मोत्यांची. वेगवेगळ्या रंगांची. कोणी तिर्हाईत शेजारून गेला आणि झटक्यात ती माळ ओढली. तुटली. निसटली. सगळे रंग आणि मोती रस्त्यात पसरले. मौल्यवान नव्हती ती, इतके कळल्यावर ते इसम तिकडून पळाले. धागा हातात घेऊन ती रस्त्यावरचा पसारा पाहत होती. मोती मात्र गेले दूर दूर. सगळेच पुन्हा मिळणार नाही, जशी आधी होती तशीच माळ पुन्हा होणार नाही. हरवण्याच्या भीतीने उचलण्याचे ही लक्षात नाही आले. बराच वेळ त्याचा धागा तिच्या हातात होता. दुरवर पडलेला एक निळा मोती कोणाच्या तरी पायाशी आला. पुढे वेगवेगळ्या रंगाना वेचत बरेच मोती त्याने ओंजळीत एकत्र केले. शेवटचा मोती उचलताना तिच्या हातात असलेला धागा दिसला आणि तिच्याकडून तो धागा घेण्याच्या ऐवजी तिला सगळे मोती दिले. पुन्हा माळ तयार झाली. मोती सगळे तेच होते, रंग ही; पण यावेळी रचना वेगळी होती. आयुष्याचं ही असंच काही तरी असेल... नाही का ?
आपल्याकडे ही असतात की रंगीत मोती... काही शोभा वाढवतात. काही त्यांचे वेगळे वलय करतात. त्यांचे चमकणे कधी सोबतीच्या खड्यांची चमक वाढवते. कधी जबाबदारीचे सांभाळणे. कधी फक्त पाहून भाळणे. कधी पांढरे शुभ्र ज्यात बाकीचे रंग उठून दिसतात. काही पिवळसर, अगदी नैसर्गिक सौंदर्य घेऊन येतात. त्यांचे चमकणे ही मर्यादित पण अखंड ताऱ्यां सारखे. आपल्या आजूबाजूला बरीच गर्दी असते. गर्दी असते मोत्यांची... माणसांची !
त्यात ही भुरळ पडणारे, शोभा वाढवणारे असतातच की, काही अनुभवातून पांढरे शुभ्र झालेले, चमकणारे; तर काही अगदी नैसर्गिक. कधी किनाऱ्यावर तर कधी वाळूत अडकलेले. त्यात ही असते प्रत्येकाचे वेगळे विश्व. एकाच नावाचे लेबल असले तरी एकमेकांपासून खूप वेगळे.
त्यातल्या एकाची कहाणी सुरू होते समुद्राच्या तळाशी. अंधारात. कुठल्या तरी कोपऱ्यात. दोन शिंपल्याच्या कवचात. शिंपल्याच्या बाहेर ही जग आहे. त्या जगात धाग्याच्या शोधात येण्याचा त्यांचा प्रवास समुद्रा इतकाच गूढ असतो. आज शिंपल्यातला कुठला तरी मोती तो प्रवास पार करून रस्त्याच्या मधोमध पडला होता. त्याचे चमकणे तेव्हा शिंपल्यात ही त्याला माहीत नव्हते. आज ही नाही. त्याचे चमकणे पाहणारी, ठरवणारी ती धागा घेऊन उभी होती.
अशा वेळी मग यांना एकत्र करण्याचे काम करणारा धागा .... दुवा... प्रत्येकाला स्पर्श करून जाणारा... त्याची त्याची प्रत्येकाची ओळख जाणणारा आणि बांधणारा. आपल्यातला एक. इतकं वेगळं असून एक वाटण्याचं जबाबदारीचे काम तो करतोय. अशा वेळी धागा तुटला, सगळे विखुरले, जमिनीवर पडले तरी धागा हाताच्या मुठीत घट्ट धरलेला होता. तो धागा असणार विश्वासाचा... आवडीचा की तुटलेली माळ जोडण्याचा... त्या इच्छेचा ...प्रयत्नाचा. जेव्हा तिच्या ओंजळीतले सारे मोती त्या माळेत गेले तेव्हा एक त्यातला मोती कमी पडलेला. म्हणली " आधी सारखी नाही, वेगळी झाली ही माळ." कदाचित त्या एकाच्या नसण्याचे ही तिच्या लक्षात आले असावे. त्याने एक मोती त्याच्या खिशातून काढला आणि म्हणला " हा माझ्याकडे ठेवतो "
तिने कारण विचारल्यावर म्हणला " हा माझ्या पायाशी आलेला पहिला मोती होता जो खर तर खूप दूर निघून गेलेला. त्याचा माग काढत मी इथवर आलो. आणि असे रंगीत मोती मिळाले. आकर्षक तर सगळेच होते, पण समोर लक्ष गेल्यावर एक पाणीदार मोती मला डोळ्यातून पडताना दिसला, त्या नंतर मला ते सगळे मोती माझ्या जवळ ठेवण्याची इच्छा च झाली नाही." " हा पहिला मोती मी तसाच रस्त्यात पाहिला नसता किंवा उचलला नसता तर हे मिळाले नसते. डोळ्यातून वाहणाऱ्या त्याची किंमत कळली नसती. एकदा असाच तो मौल्यवान पाहिला होता... तिच्या डोळ्यात ...पण तेव्हा त्याचे मूल्य समजले नाही... फार दूर निघून गेला होता तो. आज ती संधी मला परत मिळाली. हा खिशातला तिच्या आठवणीसाठी... चालेल ना ... " तो त्या मुलीच्या शांत झालेल्या चेहऱ्याकडे पाहत दोन पावले मागे आला. त्या एकाचे तिला इतके काही वाटले नसावे पण माळ पुन्हा तयार झाली याचा आनंद होता. तुटल्याचे दुःख आणि जोडल्याचा आंनद किती सहज दिसला तिच्या डोळ्यात. ती आनंदाच्या भरात माळ घालून तशीच उड्या मारत तिथून काही वेळात निघून गेली. जशी बागडत आपल्या हातून वेळ निघून जाते तशीच.
- ©® जुईली अतितकर
खूप छान
ReplyDelete