२६. जत्रा

जत्रा... जेव्हा जेव्हा आपण तिथे जातो ना, तेव्हा असते तिथे खूप सारी गर्दी, असंख्य चेहरे, वेगवेगळे आवाज,  जितके जातो पुढे तितके कळत जाते आपले एकटेपण. पदोपदी मिळत जाते अशी अनोळखी जत्रा आणि त्यात ओळखीचा हात शोधणारे  एकटे आपण. आपणच जमवलेली चार माणसे सोबत ही असतात तरी वाटतो आपला एकट्याचा प्रवास. 
लहानपणीची ती गावातली जत्रा. तिथली वेगवेगळी  खेळणी आणि दुकानांची गर्दी, दिव्यांचा झगमगाट, तिथला उत्साह. घरून निघताना आपण पकडलेला हात माघारी येईपर्यंत असतोच सोबत. तेव्हाची ती घट्ट पकडलेली मूठ सुटणार नाही याच भरवश्यावर पुन्हा नव्या जत्रेत जाण्याचे आपण धाडस करतो. अशा वेळी न कळत सुटते आधीची घट्ट पकड आणि तो ओळखीचा हात. मग अनोळखी जत्रेत शोधत फिरतो आपण ओळखीचा हात. जत्रा अनोळखी असते. जागा अनोळखी. अशा अनोळखी ठिकाणी आपण ओळखीची ऊब शोधू लागतो. ती शोधण्याची आपली धडपड आणि आपला केविलवाणा प्रवास. मिळालाच एखादा ओळखीचा हात तरी ओळखीची ऊब मिळेलच असे नाही. तिथे असतात सभोवती कुजबुजणारे असंख्य आवाज आणि आकर्षक दुकाने. 

तिथे जेव्हा पाहतो आजूबाजूला तेव्हा दिसते काही जगावेगळे, काही निराळे. लहान होऊन जवळ जातो. निरखून पाहतो आपण. तिथेच रमते काही वेळ आपले मन, पण ती जत्रा आहे... " काही दिवसांची " हे आठवल्यावर आपोआप पाय वळतात मागे घराकडे.
हळूहळू जत्रा आणि घर यातला फरक समजू लागतो तेव्हा मन नाही रमत जत्रेत ... कौतुक नसते फार तिथल्या खेळण्याचे. तिथल्या आकर्षक दुकानाचे. कारण अनोळखी जत्रेत ओळखीची ऊब शोधणारे मन तोपर्यंत येऊन पोहोचते उबदार घरात.  आपल्याला जत्रा आणि घर यातले अंतर योग्य वेळी समजायला हवे.

- जुईली अतितकर

Comments

Popular posts from this blog

३१. माय मराठी

२५. मोत्यांची माळ