२४. कटिंग चाय

कटिंग चाय...

कोणीतरी हवं ना यार ... आपलं सगळं सगळं ऐकून घ्यायला. असा प्रत्येकाचा एक जवळचा मित्र असतो किंवा मैत्रीण असते. कधी ती व्यक्ती असते तर कधी ती एखादी गोष्ट ... एखादी वस्तू ही असू शकते.  किती वेगवेगळी माणसे... वेगवेगळे स्वभाव... वेगवेगळे प्रसंग... यांचं हसणं, बोलणं, रडणं,भांडणं सगळं सगळं अगदी कान देऊन ऐकत असते. तसाच एक मित्र तिथेच टेबलावर मधोमध असतो. ऐकतो सगळं ... टॉप सिक्रेट, कोणाची काळजी, कोणाचे प्रॉब्लेम, कोणाचे यश, अपयश. उकळून,  गाळून, फिल्टर होऊन इथे असा टेबलावर येऊन बसतो. इतकं सगळं ऐकून घेतल्यावर आज मला ही काही सांगायचे आहे अस काही तरी तो म्हणू लागतो. माझ्या अवती भवतीच्या चहाच्या गप्पा ... त्याच्याकडे कान असतो पण आज माझ्यासाठी कान होणार का ? अस  टेबलवर एक पाच मिनिटं ठेवलेल्या चहाचे हे आगळे वेगळे मागणे मी मान्य करते आणि त्याची माझी झालेली चाय चर्चा. 

दिवसाची सुरुवात कोणाची सूर्यप्रकाश पाहून होते कोणाची मोबाईल पाहून, घड्याळ पाहून तर कोणाची टेबलावरचा चहा पाहून. सूर्योदय, सूर्यास्त दिवसातून दोन वेळा. कधी दिवसातून तीनदा, औषधांची वेळ कशी असते ना, तस काहीसं. अगदी डॉक्टरांनी सुचवलेले पथ्य पाणी वाटावे इतके अचूक. अचूक वेळेला भूक कशी लागते तशीच ही चहाची वेळ. कधी अवेळी ही भूक लागते, तशीच चहाची तलप. काही जण त्याच्या इतके जवळचे, जिवा भावाचे होतात की चहाचे व्यसन वगैरे असं काही इतरांकडून ऐकून नाहक बदनाम ही होतात. बरं याला काही वेगळे व्यसनमुक्ती केंद्र वगैरे असेल तर ठीक. अजून तरी कुठे नसावे. लहानपणा पासून " ताजा होले.." ऐकून जी दिवसाची ताजी सुरवात व्हायची. आज त्याला वेगवेगळे पर्याय आलेत. कोण  ग्रीन टी, कोणी आयुर्वेदिक, कोणी औषधी वगैरे असे अपडेटेड व्हर्जनला फॉलो करतात. पण पारंपरिक चहाची मजा येते ती अंदाज घेत घेत पहिला वाहिला शिकत शिकत बनवलेला चहा पिण्यात च. काहींना फार गोतावळा लागतो त्याच्यासोबत. काहींचा एकांत हाच एक मित्र होऊन जातो तेव्हा तो टेबलावर गार होत असतो. तेव्हा एखादे गाणे गुणगुणावे. एखादी गझलच ऐकावी. असा काहीसा माहोल. त्यामुळे  तेव्हा आपण एकटे नसतो, चहा सोबत असतोच  टेबलावर. कान लावून. आपलं सगळं सगळं ऐकत. 

आज तो एकटाच होता आणि मी ही. त्यामुळे आमच्या कान गोष्टी सुरू झाल्या होत्या. दर वेळी माझं बोलणं आणि त्याचे कान असतात यावेळी उलट होते. तो सुचवत होता.  मी तेच लिहीत गेले. चार दिवसांपूर्वी इथेच टेबलावर कोणाचे तरी आयुष्याचे स्वप्न असे त्याच्या कानावर पडले होते. काल आलेली ती पुन्हा चहाला. पहिल्याच घोटाला चटका बसला आणि ती स्वप्न वगैरे मागे टाकून नवीनच गोष्ट घेऊन आज आली. कोल्ड कॉफीसाठी मला विचारू लागली. हेच ते अंतर तिच्या क्षमता आणि स्वप्नामधले. बर प्रत्येक घरचा वेगळा अंदाज, वेगळे माप, साहित्य तेच पण वेगळी चव. भावनिक पूल कधी शब्दातून, इशाऱ्यातून तर कधी पोटातून जातो हे पटले तेव्हा. आपण चहाला बोलावतो ना कोणाला.. कधी ऑफिसमध्ये, शाळेत, कधी घरी. ऐकणारे दोघेच असले तरी एक प्रत्येक वेळी कॉमन फॅक्टर असतोच. तो हा तिसरा कान...चहा.

सकाळचा कोणी केलेला चहा गोड आणि कडक व्हावा. कधी तोच संध्याकाळी त्यात काही तरी कमी वाटावे. लगेच घरी विचारले जाते. दिवस कसा गेला ?  कुठे काही बिनसल्याचे अचूक हेरले जाते. त्यावर तो म्हणूच शकतो " न बोलता ही मन वाचण्यासाठी आज मी होतो. उरलेला संवाद आता पुढे व्हायला हवा, नाही तर उशीर होईल. " मग गाडी विषयावर येते. आणि  आपण थेट किचनचा ओटा गाठतो आणि पाठमोऱ्या तिला सगळं सांगू लागतो.

एकदा मैत्रिणीसोबत मी वडे घ्यायला गेले होते. एक पंधरा वीस मिनिटे वडे तळायला लागणार होती. तर तिकडचे पाटील काका. ज्यांची ती वडापावची गाडी होती, त्यांनी आम्हा दोघीना दोन कटिंग चाय मागवले. ते संपवता संपवता जी गप्पांना सुरवात झाली. त्यात पाटील काकांनी कधी एन्ट्री घेतली कळले ही नाही. पंधरा मिनिटांचा वेळ बोलता बोलता कधी अर्धा तासांवर गेला. वडे कधीचे कढई मधून बाहेर आले होते. पण चहा आणि गप्पा यांच्या नादात त्यांचा विषय बाजूलाच राहिला. चहाचा ग्लास रिकामा होऊन बाजूला ठेवताना आम्ही नक्की कोणत्या कामासाठी तिकडे आलो होतो त्याची थोडी उशिरानेच आठवण झाली. वडे ही घेतले. हातात ती पिशवी देताना बरे पाटील काका ओघाओघात तेच म्हणावे  " पुन्हा या चहा घ्यायला ! " तेव्हा बटाटा वड्यानी कदाचित मनातल्या मनात म्हणले असावे, आम्ही काय घोडे मारले ? "कुठे तरी वड्यांना वाईट वाटले असेल पण चहा ने बाजी मारली होती हे नक्की. 

ही एक आठवण होतीच. अशा छोट्या छोट्या किस्सा कहाण्या त्याच्या माझ्यात झाल्या होत्या. चहासाठी जसे कोरे पाणी शेगडीवर ठेवावे. गरम पाण्यात सारे सारे मिसळून जावे. आठवणीसोबत तो  तसाच प्रत्येक वेळी माझे ऐकणारा कोरा कायम टेबलावर असायचा आणि माझ्या तेव्हाच्या आठवणीमध्ये मिसळत जायचा. मी सारे सारे जमा करत गेले. आज त्याचे कान देऊन ऐकताना मी किती जणांचे कान झाले याचे गणित सुटले. 


- जुईली अतितकर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

३१. माय मराठी

२५. मोत्यांची माळ

२६. जत्रा