२३. बकुळीचे झाड
" माणूस नावाचे झाड " शोधते... कधी कधी माझं झाडांशी इतकं जवळच नातं जोडलं जातं की न राहवून मी माणूस आणि झाड तुलनात्मक प्रवासाला लागते. त्याचाच सुवर्ण मध्य म्हणजे हे माणूस नावाचे झाड ...
काही दिवसापूर्वीचा हा किस्सा आहे. माझ्या चालण्याच्या रस्त्यात एक बकुळीचे झाड लागले. आज त्या झाडाच्या जवळ थोडा वेळ रेंगाळत होते. खाली पडलेल्या बकुळीच्या फुलांचा तो सडा त्यांच्या जवळ च बसण्याचा सतत मला आग्रह करत होता. झाडाखाली बसल्या बसल्या काही जवळची फुले मी माझ्या निळ्या ओढणीत जमवायला सुरवात केली. केशरी झालेल्या आभाळाने मला तिथून आता निघण्याचे संकेत दिले होते. मी त्या ओढणीतली फुले तशीच एकत्र करून एक गाठ बांधली आणि घरी आले.
दिवस सरला. कामे आटोपली तशी मी माझ्या नेहमीच्या झोपण्याच्या जागेची आवरा आवर केली. हातातला फोन बाजूला ठेवून झोपणार इतक्यात माझ्या उशाशी तीच निळी ओढणी पडलेली दिसली. बाजूला ठेवताना त्यातून बकुळीच्या फुलांचा दरवळ मला शिवून गेला. ती ओढणी मी आणखी जवळ घेतली. त्याला बांधलेली ती गाठ अजून तशीच होती. मी कशी बशी ती सोडली आणि त्यातली फुले बाजूच्या टेबलावर ठेवली. ओढणी पुन्हा जवळ घेतली. त्याचा दरवळ अजून ही तसाच होता. तिला तशीच उशाला ठेवून मी झोपले.
आदल्या दिवशी योगायोगाने समोर आलेले ते झाड आज जाणीवपूर्वक पाहायला मी पुन्हा निघाले. न विसरता तशीच ओढणी सोबत घेतली. त्याच ठिकाणी आले ते पुन्हा त्यांना ओढणीत सामावून घेण्यासाठी आणि तशीच गाठ पुन्हा बांधण्यासाठी.
एखाद्या वाटेवर चालताना जाण्याआधी आपल्याला माहिती नसते पुढे एक सुगंधी दरवळणारे झाड आहे. योगायोगाने झालेली ही भेट तेव्हा पुन्हा तो प्रवास करायला लावते. कशासाठी ? कुतूहल ... ओढ की प्रेम.
कदाचित तिन्ही. आधी कुतुहलातून सुरू झालेला हा प्रवास ओढ निर्माण करतो आणि तेव्हा निस्वार्थी प्रेमाचे गणित उलगडते. आता हा प्रवास सुरु होतो माणूस नावाचं झाड शोधण्याचा. त्यातही असते कुतूहल... ओढ.
बकुळीच्या झाडाचा आणि माणसाचा हा प्रवास.
तेव्हा त्या झाडाच्या भवताली पडलेल्या फुलांचा सडा आणि त्या फुलांचा दरवळ. त्या झाडाकडे जे खूप छान आणि मौल्यवान आहे ते त्याने सहज सोडले. जमिनीवर पडले. तो सडा तसाच होता..आज ही. कुठून आला त्या झाडाकडे इतका दिलदार पणा ...दानशूर पणा ? त्या रस्त्यावर त्याच्या जागी काल ही ते झाड तसेच फुललेले होते आज ही ... मी पुन्हा येण्याची खात्री त्याला होती का ... तसेच अबोल आणि स्थिर ... इतके स्थैर्य त्याच्या खोडाकडे होते. म्हणून च का या कुतूहलाचा पाठपुरावा करत ती ओढ हळूहळू निस्वार्थी प्रेमात बदलत होती.
मग उगाच माणूस नावाचे असेच झाड आपण शोधू लागतो. त्या कुतुहलातून आणि प्रवासात कुठे तरी दिसते ही असे झाड ... पण त्याच्या खाली सडा असतोच असे नाही. त्याची पाने फुले असतात त्याच्या फांद्यांना चिकटलेली. अगदी एकरूप झालेली. सहज गळून पडत नाहीत. ती असतात कधी तत्वाची, कधी कर्तृत्वाची, कधी रुबाबाची, सौंदर्याची, प्रतिष्ठेची, नावाची, जातीची आणि आवडी निवडीची.
जेव्हा पुन्हा आपण ते झाड शोधायला येतो ना ते तिथे नसतेच मुळी. ते पुढच्या प्रवासाला निघालेले असते. आपण ही मग दुसरे झाड शोधू लागतो. बकुळीच्या त्या झाडाला विचारले असा फरक का ? तर तसे ते झाड़ वाऱ्यावर थोडे झुलते आणि म्हणते...वेडी आहेस ... माझी ही पडलेली फुले आवडली म्हणून शोधत शोधत काल आलेले आणि आज पुन्हा येणारे एक माणूस नावाचे झाड या झाडाजवळ आहेच की...." त्यांच्यातला तो दरवळ मला मंगेश पाडगांवकरांच्या ओळी कानाशी येऊन सांगत होता "
लाजऱ्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जिवा
अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा
तू अशी जवळी रहा...
अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा
तू अशी जवळी रहा...
शोध तिथेच संपला... इतकंच
- जुईली अतितकर
फारच सुंदर, मला अनुभवता आला तुझा अनुभव आणि बकुळीचा तो मंद गंधही 😍🥰
ReplyDeleteधन्यवाद .
ReplyDeleteखूपच सुंदर शबदबद्ध केलास माझा अनुभव. साताऱ्यात एक दर्गा आहे. त्याच्या फुटपाथवर असेच एक बकुळीचे झाड होते. येता जाता बायका ती फुले वेचत. काही हौशी बायका झाड गदागदा हलवून सडा पाडत आणि शक्य तितकी फुले वेचून घेत. आता मात्र ते झाड तिथे नाही. त्या नाजूक फुलांचा गंधही नाही.😢
ReplyDeleteचांगलं लिहिलीयेस आणि समजावलेसही 😍🙌🏻
ReplyDelete