२. प्रिय शाळा

प्रिय शाळा…
      लहानपणी माझी शाळा विषयावर चार - पाच ओळी लिहायला ही किती डोकं खाजवायला लागायचं. सुरुवात करायलाच पहिली पाच मिनिटे जायची. आज शाळेसाठी लिहिताना कुठून नक्की लिहायला सुरवात करू अशी परिस्थिती झाली. आज सात - आठ वर्षांनी शाळेविषयी लिहायला गेले तर वहीची पानंही कमी पडतील पण शाळेसोबत जोडलेल्या त्या जिवंत आठवणी काही संपणार नाही. भांडून तोंडून मिळवलेली आपली बेंचवरची जागा काय आणि शेवटून सुरू होणारी ती गृहपाठाची तपासणी आज त्याच जागेवर बसून झपकन डोळ्यासमोरून जाते. आज माननीय मुख्यध्यापकांच्या बोलण्यात आलेले एक वाक्य " शाळा आठवणीत राहते, दिसते आणि मोठी होते ती तिथल्या सोयी सुविधामुळे नाही, तर विद्यार्थ्याच्या वागण्या - बोलण्यातून " आणि याची जाणीव त्या बाल वयात नाही तर त्या चार भिंतीच्या बाहेरच्या जगात पाऊल ठेवल्यावर होते. माझी मराठी शाळा मला हे नेहमीच शिकवते, तुम्ही कितीही मोठे व्हा, जेव्हा ते उंच शिखर गाठाल, पुन्हा शाळेची पायरी चढताना आपोआपच आपली मान तिच्यासमोर झुकते आणि या ज्ञानगंगेत नाहून निघाल्यावर घडणारे मौल्यवान हिरे कधीच जगाच्या बाजारात कवडीमोल होत नाही. 
      लहानसं विश्व असतं आपलं चार भिंतीचं. त्यात अजून चार भिंती वाढतात आणि तेच विश्व मोठं होतं. त्याच लहानश्या प्रवाहात पहिली वाहिली दहा वर्ष नकळत कधी संपतात कळतही नाही. ज्या विश्वात आपले अंतरंग फुलते, बहरते अशी शाळा तेव्हा मात्र नवी असते. पण आज दहा वर्षानी खूप जवळची वाटते. अगदी आपल्या राहत्या घरासारखी. म्हणूनच शाळेत पहिले पाऊल टाकताना आलेले गंगाजमुना आणि तिथून पाय काढताना आज भरून आलेले ढग सारखेच भासतात. शाळेच्या त्या भिंती आजही कान देऊन ऐकलं की मराठीच्या पुस्तकातील कविता तालासुरात गात असतात. प्रयोगशाळेत आज ही उपकरण नव्याचा शोध घेतात, फळ्यावर आज ही "सुंदर अक्षर हाच खरा दागिना " वर्गाची शोभा वाढवतो. आज ही मैदानावर लहान सहान फुलपाखरं बागडत असतात. त्याचे आवडीचे फुल शोधत. वर्गातले बेंच आज ही वाद विवाद करतात. शांतपणे. आमचं हसणं, रडणं, चिडणं आणि वाढणं सगळंच पाहिलेली अशी माझी शाळा. जो पर्यंत तुझ्या सहवासात होतो. सुरक्षित होतो. नंतर सुशिक्षित झालो आणि आज जबाबदार. इतकं दिलंस. सकाळच्या प्रार्थनेपासून ते शेवटच्या पी टी च्या तासापर्यंत आम्हा मुलांची होणारी वाढ पाहणारी आणि अनुभवणारी एक साक्षीदार हीच माझी शाळा. तिला पुन्हा भेटायला येणं आणि त्या आठवणी पुन्हा जिवंत करणं कोणाला आवडणार नाही, " काय ग चिमणे, दोन दिवस का नाही आली शाळेला " , हे प्रेमळ दटावणे आज ही या चिमणीला उडायला शिकवते..." ही आवडते मज मनापासुनी शाळा लावते लळा ही जसा माऊली बाळा " अशी आईसारखी माया करणारी, जवळ घेणारी तर कधी  शिक्षा करून वळण लावणारी अशी माझी शाळा, संधी शोधत बसण्यापेक्षा ती निर्माण करायला शिकवणारी, ज्ञानापासून विज्ञानापर्यंत आमचे बोट धरून आणणारी, न कळत्या वयात संस्काराचे बीज त्या कोवळ्या मनात अलगद पेरणारी अशी विद्यावर्धिनी, सरस्वती...माझी शाळा.
आज पुन्हा नव्याने कळलेली तीच का ही माझी शाळा...होय ...तीच 

- जुईली अतितकर

Comments

Popular posts from this blog

३१. माय मराठी

२५. मोत्यांची माळ

२६. जत्रा