३. आदरणीय शिक्षक
आदरणीय शिक्षक...
एक दोन दिवसांपूर्वी शिक्षक दिन होऊन गेला. जयंती, पुण्यतिथीप्रमाणे तो छान ऑनलाइन साजरा ही झाला. आपल्या हातातल्या पेन आणि पेन्सिलचा उपयोग करून कोऱ्या पानावर श्री गणेशा करायला शिवणारे कोण...शिक्षकच. तुमचा तो दिवस. काल हे पत्र लिहावेसे वाटले. शुभेच्छा म्हणून नाही. एक आठवण म्हणून. हातावरच्या रेषा नाही तर हाताला आणि बुद्धीला वळण लावणारे भाग्य रेषा म्हणून लाभलेलं वरदान म्हणजे शिक्षक. उडणारी, पळणारी अक्षरे एका ओळीत बसवली, त्यांच्यावर प्रेम करायला शिकवले, त्याचा आदर करायला शिकवला, त्याचे अर्थ आणि सामर्थ्य पटवून दिले असा माणसाच्या रूपातील देवमाणूस म्हणजे शिक्षक.
आज जेव्हा बदलत्या समाजात एक शिक्षक म्हणून उभं राहते तेव्हा मुलांची ज्ञानाची भूक दिसते. कधी गुणवत्तेमागे धावणारी ओळ दिसते. कधी कष्ट करून पुस्तकांची झालेली झीज दिसते तर कधी सोप्या मार्गाने ओरबाडून घेतलेले यश दिसते. झिजवतो तो भक्षक, सांभाळतो तो रक्षक आणि शिकवतो तो शिक्षक. नुसत्या अभ्यासाने वाढते ते बाभूळ अन शिक्षणाने वाढतो तो वटवृक्ष, ज्याच्या पारंब्या चार ही दिशांना पसरत जातात आणि आणखी मजबूत करत जातात लहान मोठ्या फांद्यांना, पानांना, झाडाला आणि समाजाला. लहानपणी शिकलेल्या " गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु , गुरुर देवो महेश्वरः , गुरुर साक्षात परम ब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः " या मंत्राचा अर्थ तेव्हाच कळतो जेव्हा तुमचा विदयार्थी तुम्ही शिकवलेल्या सूत्राने गरजेला तुमच्याकडून चुकलेलं गणित दुरुस्त करून देतो आणि अचानक मोठं मोठी गणित आपसूक सोडवायला लागतो. त्यावर आपलेच आभार मानतो. समाजाला गरज आहे त्या शिक्षकाची जो शिक्षणासोबत ऊर्जा देईल. वळण देईल. गरज आहे त्या शिक्षकाची जो व्यविचाराची चाळण बनेल. गरज आहे अशा शिक्षकाची जो घ्यायला नव्हे दयायला शिकवेल. जगण्याची कला शिकवणारा कलाकार. समीक्षक हवा आहे...शिक्षक हवा आहे. भरकटलेल्या वादळात दिशा दाखवणारा दिशादर्शक हवा आहे. शिक्षक हवा आहे. जग भरलेले आहे वैज्ञानिकांनी, शास्त्रज्ञानी, समाजसुधारकांनी, साहित्यिकांनी त्यांना हुडकून काढणारा आणि जगासमोर आणणारा शोधक हवा आहे. शिक्षक हवा आहे. ज्ञान ही न संपणारी रसद आहे तिला योग्य हाती सोपवणारा रक्षक हवा आहे. शिक्षक हवा आहे.
तुमची विद्यर्थिनी.
- जुईली अतितकर
शिक्षक हा समाजाचा पाया आहे. जो एक आदर्श समाज आणि आदर्श माणूस घडवतो. तुम्ही तोच एक भाग. वर्णन खूप सुंदर केलं आहे.
ReplyDeleteतुम्हाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी...💐💐💐
धन्यवाद ओमकार
Deleteअगदी खरे आहे