४. प्रिय दादा

प्रिय दादा, 
     विसरलास का रे बहिणीला... आज रक्षाबंधन आहे. कामाच्या व्यापात तुला माझ्याशी बोलायचा वेळ मिळतच नाही. पूर्वी सारखं एकाच गोष्टीवरून तासनतास आपल्या गप्पा रंगत नाही. वाद सोडाच तू हल्ली मला खुशाली पण विचारत नाही. विसरलास का रे बहिणीला. तुझ्या पहिल्या आणि जवळच्या मैत्रिणीला ?
     आज रक्षाबंधन आहे.  तुझ्या बिझी वेळापत्रकातून वेळ मिळेल तसं माझ्याशी बोलता येईल, वाचता येईल,  म्हणून आज हे पत्रच लिहिलं शेवटी. राखी आहे पत्रासोबत आणि तुझी जबाबदारी सुद्धा...राखी बांधशील ना जेव्हा मनगटावर तेव्हा आपोआप ती जबाबदारी ही मिळेल तुला. फक्त तुझ्या बहिणीच रक्षण करण्यासाठीच नाही बरं का...या बहिणीसारख्या इतर ही बहिणी आहेत याची जाणीव ठेवण्यासाठी, त्याच्या नजरेला नजर देताना, त्यांना मदत करताना, त्यांची मदत घेताना, समाजाच्या बदलत्या रंगात रंगून जाताना येते ती जबाबदारी. आज ही राखी अशीच नाही बांधायची, ओवाळणी हवीच आहे मला...लहानपणी सारखा हट्ट समज...नाहीतर बंधूप्रेम...आपल्याला गिरवायला शिकवणाऱ्या, संस्काराचे बाळकडू देणाऱ्या, युद्ध जिंकणाऱ्या कोणाच्या तरी बहिणीच होत्या. अशा बहिणींना झुकून नमस्कार करण्यात कमीपणा समजू नकोस. पंखात बळ नसताना ही उंच आकाशात भरारी घेणाऱ्या ही बहिणीच होत्या त्यांना आकाशात उडताना पाहून खाली खेचू नकोस, परिस्थितीने गांजलेल्या, समाजाने दूर केलेल्या ही कोणाच्या तरी बहिणीच होत्या त्यांची मदत करताना शरमू नकोस. स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेऊन मैदान मारणाऱ्या, शत्रूवर विजय मिळवणाऱ्या, स्वतः च साम्राज्य उभं करणाऱ्या ही बहिणीच होत्या अशा बहिणीचा मान ठेवायला विसरू नकोस. उद्या दुसरी एखादी बहीण आपले स्त्रीत्वाचे दुःख घेऊन समोर आली तर आधार म्हणून तिला विश्वास दे, शक्ती दे, बेड्या बनून जखडून ठेऊ नकोस. 
   राखी हा धागा आहे, या पवित्र नात्याला टिकवणारा, विश्वास देणारा, जबाबदारी देणारा बांधण्याआधी क्षणभर विचार कर पण नंतर तो मधेच सोडू नकोस.  आज ही ओवाळणी मागताना ताई झाल्याची जबाबदारी आणि थोडं जबाबदारीच ओझं वाटल्यासारखं झालं, त्यामुळे आता ही ओवाळणी देऊन ते आणखी कमी तू करणार याची मला खात्री आहे.

तुझी ताई.

- जुईली अतितकर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

३१. माय मराठी

२५. मोत्यांची माळ

२६. जत्रा