५. पावसाचे पत्र
हॅलो,
मी पाऊस बोलतोय. बऱ्याच दिवसात आपली भेट झाली नव्हती. म्हणून तीन - चार दिवस भेटीला आलो होतो. तुमच्या गावी. या वेळी मुक्काम थोडा लांबलाच नाही का...कदाचित म्हणून तुम्ही पृथ्वीवरची माझी लेकरं रागावली असाल माझ्यावर.
साहजिकच आहे ते. आपल्या घरी आलेल्या नव्या पाहुण्याचा ताप झाला की चिडचिड तर होणार त्यातून नुकसान केले तर कायमचा त्रासाचा वाटेनं कदाचित. या वेळी मात्र हा पाहुणचार थोडा महागात पडला त्याबद्दल माफी.
पण जर माझ्या अस्तित्वाचा विसर पडला, माझ्या सुंदर सजवलेल्या सृष्टीला जर किंमत मिळाली नाही, तिला ओरबडणारे हात जर वाढू लागले तर मात्र मी कसा शांत बसणार ? आई बाप आणि गुरू ज्याप्रमाणे आपल्याला चुकीच्या मार्गावरून योग्य दिशेला आणतात. काय चूक काय बरोबर ते दाखवतात, तसाच मी ही आलो गर्जत बरसत. आपले अस्तिव दाखवायला. आपली शक्ती दाखवायला. लोकांचे खोटे मुखवटे उतरवायला. झापडावरची धूळ स्वच्छ करायला. त्यांची हुशारी पाहायला. त्यांच्यात विझत चाललेल्या कृतन्यतेला पुन्हा पेटवायला.
मी आलेलो जीवनाची मूल्ये शिकवायला. जीवनाचा अर्थ सांगायला. हसत, रडत, पडत धडपडत पुन्हा उभे राहायला. वाढलेला बुद्धीचा अहंकार बेचिराख करायला. एक सांगू का आपण जन्माला घातलेल्या या लेकरांना रडताना, खचताना नाही पाहवत मला. म्हणूनच कदाचित माझे अश्रू अनावर होतात. कधी आटतात तर कधी कोसळतात आणि यात माझ्या कमकुवत आणि दुबळ्या लेकराचा हकनाक बळी जातो.
हे पत्र मी लिहिलं तुमच्या सगळ्यांच्या प्रेमा खातर.
जसा गर्जत आलोय तसा शांत ही होऊन जाईन फक्त एक विनवणी आहे एकदा मला तुमचा जवळचा मित्र समजा. तुमची आई, वडील समजा. गुरू समजा आणि जितकी काळजी या सगळ्याची घेता तितकी माझ्या मुक्या अबोल आणि गरजू लेकरांची घ्या. या निसर्गाची घ्या. पुन्हा येईन मग मी फुलवायला. बहारदार फुलांसाठी, झाडा झुडपांसाठी, माणसांसाठी, प्राण्यांसाठी, पक्षांसाठी वनांसाठी संजीवनी बनून.
शेवटी एक ओळ शाळेतल्या मुलांच्या प्रार्थनेतुन कधी तरी ऐकलेली माझ्या सर्व होरपळलेल्या लेकरांसाठी.
" सृष्टीवरी अवघ्या एका प्रभूची पाखरं "
" वंदू सारे त्याला जोडुनिया दोन्ही कर "
- जुईली अतितकर
Comments
Post a Comment