६. पत्रकार दादा / ताई
पत्रकार दादा / ताई ,
आपली दृष्टी अंधुक झाली किंवा नजर कमजोर झाली की पहिले डोळ्यांची तपासणी करून दृष्टी सुधारण्यासाठी चष्म्याची निवड करतो. त्याच चष्म्याने रोज सगळे जग पाहतो. आपली काम करतो. आपली नजर सुधारण्याचे काम मग हा चष्माच करतो. समजा त्या चष्म्याची निवड चुकली तर.
प्रत्येक ठिकाणी आपली ही नजर पोहचत नाही अशा वेळी चष्म्याचे काम करतात ते पत्रकार. समाजात चाललेल्या बऱ्या वाईट गोष्टी नजरेसमोर आणण्याचं काम हा चष्मा करतो नाही का ?
तुम्ही जे पाहता, जिथे राहता, जे शिकता आणि जसे घडता हे सगळंच जर या समाजावर अवलंबून असेल तर त्याच समजाला रंगवून सांगायचं काम करणाऱ्या पत्रकारांचे खरं तर केवढं कठीण काम. लहान मुलालाही त्याच गोष्टी सारख्या दाखवून त्याची मानसिकता बदलते. विचारांची दिशा बदलते, तेच काम पत्रकार करतात. रोजच्या कामात आपण इतके व्यस्त असतो, त्यातून किती आणि काय परिणाम होतो. आपली ऊर्जा नक्की कोणत्या दिशेला वाहते याचा विचार झाला का कधी ? खरं तर प्रकाशात आणण्यासारख्या बऱ्याच चांगल्या गोष्टी जगाच्या कोपऱ्यात कुठे ना कुठे घडत असतात पण त्याचे तितके प्रभावीपणे प्रदर्शन होते का ? किंवा किती प्रमाणात होते ? माणसांनी त्याच्या कष्टाने घडवलेला बदल, त्यातून निर्माण झालेली सकारात्मक मानसिकता आणि झालेली क्रांती किती बिंबवले जाते लोकांवर.
सिंधुताई सपकाळ याच एक उदाहरण द्यावेसे वाटते. त्यांचे कार्य तर अमूल्य आहे, पण फक्त आणि फक्त ते प्रकाशात आल्याने त्यातून प्रेरणा घेऊन आज अशा अनेक संस्था त्यांना फॉलो करत आहेत. त्याच कार्यात कार्यरत आहेत. मदतीचे हात आपोआप पुढे आले आणि त्यातलेच बरेच देशाचे नाव पुढे नेणारे रत्न ही घडले.
मीडियामुळे किती पब्लिसिटी झाली माहीत नाही पण त्यातून किती अशी उदाहरण पुढे आली ज्यांनी समाजासाठी खारीचा वाटा उचलला. सिनेक्षेत्रावर, राजकारणावर चर्चा रंगू शकते तर अशा विलक्षण लोकांवर का नाही ? नुसतेच देशाच्या प्रगतीवर गप्पा मारणारे " इस देश का कुछ नही हो सकता "असे टोमणे मारणारेही चिडीचूप होतात अशी उदाहरण पाहिल्यावर. बरेच लोक या समाजकार्यात मोलाचा वाटा देत ही असतील. नुसतेच एकमेकांच्या मागे पळण्यापेक्षा या वेगवान क्षेत्राचा थोडासा वेग कमी करून आपल्या चष्म्यावरची ग्लॅमरची धूळ साफ करून दाखवावे या देशाचे, समाजाचे ते चित्र जिथे कष्टाला किंमत आहे, प्रमाणिकपणावर विश्वास आहे, देशावर प्रेम आहे, विद्येला मान आहे, परदर्शकतेला प्रतिष्ठा आहे, तेव्हाच प्रामाणिक मेहनत करणारी कर्तव्य दक्ष मुलं इथे देशात, समाजात शिल्लक राहतील.
- जुईली अतितकर
Comments
Post a Comment