९. पिटुकला राक्षस
हॅलो,
बऱ्याच दिवसापासून डोळ्याला ही न दिसणारा मी पिटुकला राक्षस आपल्या सगळ्यांच्या चर्चेत आलो आहे. कोणीतरी म्हणलं आहे, साईज वर जाऊ नका, थोडे सांभाळून राहा. याची पावलो पावली आठवण करून देणारा पिटुकला राक्षस.
मी राक्षस का म्हणलं माहिती आहे, कारण एकदम साधं सरळ आहे, काही वेळा लोकांना दगडातला देव दिसत नाही. पण माझ्या येण्याने या बिकट काळात देव ओळखायला शिकवले की नाही या राक्षसाने. त्यामुळे माझे येण्याचे कारण ही काहीतरी नियोजित असावं.
कोणी माझ्या येण्याचा योग पूर्वीच्या गीता, ज्ञानेश्वरी मध्ये लिहिल्याचे पुरावे आज दाखवते आणि त्यावर विश्वास लगेच बसतो. तो ठेवावा लागतो. माणस माणसाला या कलयुगात किती परकी होऊ शकतात आणि " कल " चा विचार करणारा एक माणूस या मायाजालात किती क्षुल्लक आहे हेच बहुतेक शतकापूर्वी त्या संत महंत्यांनी ओळखलं असावं.
आज जरी आपण चालते फिरते चक्र असलो पृथ्वीवरचे. तरीही हे चक्र कधीही थांबू शकते तेव्हा थोडे जगून घ्या, हेच ओरडत आला हा पिटुकला राक्षस.
आपल्या श्वासावरही आपला हक्क नाही हे तेव्हाच जाणवते जेव्हा मास्क लावलेले वडील लेक शाळेत सोडायला आलेले असताना ती वर्गात जाईपर्यंत तिच्या चेहऱ्यावरचा मास्क वरची नजर हटवु शकत नाही.
कुठे काय आहे आपल्या हातात चंद्रावर गेलो पण आज आपल्याच आणि दुसऱ्याच्या सुरक्षिततेच्या अटीवर राहिलोच ना बंद पिंजऱ्यात. कुणाकडे आहे त्या पिंजऱ्याची चावी. किती वेळ आहे काहीच पत्ता नाही.
बघा ना न दिसणारा मी पिटुकला राक्षस कसे भाग पडतो. आता माझ्या येण्याचे स्वागत केले तर नक्की लोक धोंडे मारतील पण थोड्या वेळेसाठी मी जे भविष्याचे चित्र सगळ्या समोर उभे केले त्याचा कोणी तरी विचार करेल का ? आपला जीव आपल्या हातात नाही...आपला श्वास आपल्या हातात नाही मग हृदयात प्रेम उरेल का ? आता तरी या वसुंधरेचा विचार करण्याची सद्बुद्धी माणसाला स्मरेल का ? चंद्रावर जीवन शोधण्यासाठी इथले अस्तित्व हरवलेलं नसेल ना ? कोणीतरी विचार करेल का.....?
एक पिटुकला राक्षस
नोव्हेल कोरोना
- जुईली अतितकर
Comments
Post a Comment