११. प्रिय स्माईल
प्रिय smile,
टेबल वर ठेवलेला हॅप्पी मॅन डुलताना पाहून आज डोक्यात एक विचार आला. बऱ्याचदा आपण ऐकलं असेल, एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणणे किती अवघड. काहींना ही कला जन्मजात अवगत असते आणि खरच हे अवघड काम करणारा खरं तर अवलियाच असतो. मग तो आपला मित्र किंवा मैत्रीण असो किंवा साधा टेबलवरचा हॅपी मॅन...!
आता एवढ सगळं हसण्यावर आणि हसवण्याच्या कलेवर बोललं मग रडण्यात ते कसलं सुख...! कोणाला आवडेल रडायला आणि रडवणाऱ्या व्यक्तीशी बोलायला.
मी स्वतः आनंदी रहा असे सहज मेसेज अनेकदा अनेकांना देते. तुम्हीही दिले असतील आणि ते पुरे पूर आमलात ही आणतो आपण. कोण ' रडत राहा ' असं का बरं बोलेल ? आपला हितचिंतक कधीच असे बोलणार नाही. तरीही कोणत्यातरी कारणाने आपण कधी तरी रडतोच. हो ना...!
कधी आपली या जगात नव्या आयुष्याची सुरवात होताना पहिलं वहिल रडणं आणि त्याचा झालेला जल्लोष असो किंवा या जगातून जाताना आपल्यासाठी इतरांच्या डोळ्यात वाहणाऱ्या आठवणी. या जीवन मरणाच्या चक्रामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या छोट्या मोठ्या सुख दुःखात आलेले अश्रू काही नवीन नाही.
तस जन्माला आल्यापासून म्हणजे नेहमीच हसतमुख असणारा व्यक्ती मिळणे खरं तर अशक्य आहे. मग का उगाच रडण्याचा द्वेष ? जस जसे आपण या जगात आपल्या हातानी एक एक पान रंगवतो. मग ते पान नेहमी कसे गुलाबी केशरी रंगाचे दिसणार? कधी कधी त्यात येणाऱ्या काळ्या तपकिरी रंगाने त्या पानाला येणारी झळाळी कोणी पाहिली आहे का ? कदाचित इतर रंगात ती लपली जात असेल. पण त्याची कमतरता ते नसताना नक्की जाणवेल तसेच काहीसे गणित आहे हे हसण्याचे आणि रडण्याचे.
कोणत्याही शुभ प्रसंगी येणारे उमाळे नकळत डोळे ओले करतातच, कदाचित ते हुंदके समोरच्याच्या कानापर्यंत पोहोचले नसतील किंवा आपण ते पोहचू दिले नसतील, पण तरीही रडतोच ना. दुःखात तर ते बांध फुटलेल्या नदीप्रमाणे किंवा मुसळदार पावसाप्रमाणे वाहतात त्यामुळे त्यात काही गौप्य नसते. त्यातही काहींची रिपरिपणारी सर असते तर काहींचा नुसताच शिडकावा. कधी कधी मात्र त्याचा प्रलय होतो आणि सगळ्या नात्याना भावनांना त्यात वाहून नेतो.
असं रडणं ही बहू रंगी असू शकत वाटलं नव्हतं ना कधी. रडणं...कधी चिंतातुर होऊन वाहिलेली काळजी तर कधी हातातोंडाशी आलेले आणि हुलकावणी देऊन गेलेलं यश, कधी आपल्याच चांगल्या वाईट कर्माचे परिणाम, कधी न केलेल्या चुकीची शिक्षा, कधी कुणाला मनापासून मागितलेली माफी, कधी मेहनतीचं फळ तर कधी निश्फल झालेले अविरत प्रयत्न, कधी काळी हरवलेल्या गोष्टीचे बऱ्याच वेळाने लागलेले सुगावे तर कधी काहीच आशा, अपेक्षा नसतानाही मिळालेलं बक्षीस किंवा एखादी व्यक्ती.
कधीही कुठेही रडणं चेहऱ्यावरच्या स्मित हस्याप्रमाणे दिसूच शकत आणि त्यात काहीच गैर नाही. कधी कधी हेच रडणं आपण मानसिक आणि भावनिक रित्या जीवंत असल्याचा पुरावा देते आणि एक राज की बात म्हणजे कधी कधी आपलं हसू समोरच्याला नक्कीच भुरळ पाडेल पण अचानक डोळ्यात आलेलं पाणी त्याच्यात दडलेल्या माणसाला नक्की च जाग करेल. कदाचित तो येणार नाही तुमचे अश्रू पुसायला किंवा त्यामागचं कारण विचारायला, पण त्याची नजर ही आपोआप तुमचे दुःख किंवा सुख वाटण्यासाठी नक्कीच एकत्र येतील.
म्हणून कधी तरी स्वतः ला नक्की प्रश्न विचारावा सगळ्यांनी "आज रडला ना...मग सुख आहे ...!"
- जुईली अतितकर
Comments
Post a Comment