१२. डिजिटल आम्ही तुझी लेकरे



प्रिय स्मार्ट फोन,

     जेव्हा पासून तू माझ्या हातात आला आहेस ना, माझ्यातला स्मार्टनेस मातीत पाणी मुरावे तसा तुझ्यात कधी मुरत गेला कळले ही नाही. सुरवातीला माझे व्यक्तिमत्व आणि माझी ओळख म्हणले की पटापट पाठ केलेल्या ओळी तोंडून निघायच्या. पण आता हा आवड, निवड आणि स्वभावाची चांगलीच ओळख करून देतो. आधी किमान बटणे दाबायचे तरी कष्ट होते आता ते ही नाही. अंगठा लावा किंवा आपलाच चेहरा त्यात आरसा समजुन पहा. तो अलिबाबाच्या गुहेसारखा उघडतो. आणि जवळ जवळ सगळेच साठवून ठेवतो. आता चेहऱ्यावर अचानक एखादा डाग जरी आला तरी आरशाची गरज लागत नाही.  तो ही हळूहळू दुरावत गेला. एक एक रेष निरखून तुझ्यात ती मिटवता ही येते आणि वाढवता ही येते. वेगवेगळ्या रंगाची, आकाराची फिल्टर असतात ना तुझ्यात. गाळणी किंवा चाळणी सारखे सगळे चित्र एका क्षणात बदलतात. कदाचित " डिजिटल ब्युटी " म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. असा हा एवढासा चतुर फोन. काम अगदी वाऱ्याच्या वेगाने करू ही शकतो आणि बिघडवू ही शकतो. 
     लाईव्ह आपण दिसतो म्हणे तुझ्यात. याचा फायदा असेलच पण त्यात गंम्मत आणि फजिती ही आपली पाठ सोडत नाही. आठवण आली की " पुराने जमाने मे " म्हणजेच पूर्वी आपण पत्र लिहायचो. नंतर जसे फोन आला आपण त्यावर पत्र लिहिणाऱ्याचा आवाज ही ऐकायला लागलो. आता तोच फोन आणखी स्मार्ट झाला आणि आता आठवण आली की त्या व्यक्तीला फक्त ऐकायचेच नाही तर पहायचे ही असते. 
      सुलभाने सतीशला ऑफिसमधून येताना मुलांना शाळेतुन आणायला सांगितले होते. जबाबदारी अगदी गड जिंकण्याची होती. त्यातच घाई घाई मध्ये सतीश फोन घरी विसरून गेला. इथेच घोळ झाला. नेहमीप्रमाणे आपला दिलेला निरोप विसरणार त्याची सुलभाला जाणीव होती. फोन घरी म्हणल्यावर आणखीनच पारा चढला. काय करावे कळेना तेव्हाच यामिनी तिची मैत्रीण तिचा व्हिडीओ कॉल आला. महिला मंडळ ची स्वाभाविक सवय. जाताना एक सेल लागलेला दिसला आणि लगेच त्याचे वृत्तांत देण्यासाठी तो कॉल होता. अगदी त्याच सेलच्या दुकानासमोर. शॉपिंगसाठी आलेली यामिनी रोडवर व्हिडिओ कॉल वर बोलताना सुलभाला मागे त्यांची गाडी पार्क केलेली पाहिली. सुलभाने तिला फोनचा कॅमेरा मागे पुढे फिरवायला सांगितला. सुरवातीला वर ..मग त्या गाडीच्या जवळपास ...थोडं खाली. नंबर प्लेटवर. सुधीर बाहेर येताना आपल्या गाडीच्या अवती भवती गाडीचा पंचनामा कोण करते हे लपून पहात होता. शेजारीच दुकानाचा दुकानदार सुधीर आणि यामिनीचे काय चालले पाहून गल्ल्यावर बसून गालातल्या गालात हसत होता.  सुलभाने यामिनीला तिला तिची अडचण सांगितली. न राहवून सतीश तिथे आला आणि गाडीशेजारी काय सुरू आहे विचारले. गोंधळलेल्या यामिनीने काहीच न बोलता सतीश समोर स्मार्टफोन नेला. समोरच सुलभाला पाहून तो ही गोंधळला. " तू इथे कुठे " उत्स्फूर्तपणे सतीश कडून निघालेले शब्द. सतीश फोन आणि मुलांना विसरल्यामुळे सुलभा व्हिडीओ कॉलवरच शिकवणी घ्यायला लागली. घरचा फोन ओ एल एक्स वर विकायचा सल्ला दिला. तार सप्तकातले बोलणे ऐकून यामिनीने तिला व्हिडिओ कॉल वरूनच उशीर झाल्याच्या खाणाखुणा केल्या आणि वातावरण शांत झाले. यामिनीने सतीशला सेल लागलेला, सुलभा ला घेऊन येण्याचा सल्ला दिला. सतीशने " वाचलो रे बाबा " म्हणत तिथून काढता पाय घेतला.
     सुलभा सतिशच्या अनुभवावरून खर तर हा स्मार्ट फोन " चतुर बिरबल " असल्याचे दाखले दिले. 
      आणखी एक खासियत म्हणजे यावर आपण आपली माहिती तर देतोच पण दुसऱ्याची माहिती आपण तुझ्यामुळे वाचू शकतो, पाहू शकतो. नवी माणसे भेटतात. जग जवळ येते. एका बटनावर. आणि पासवर्डने पुन्हा ते मैलाच्या अंतरावर जाते. प्रत्येक गोष्ट आपल्याला इथे कुलूप लावून म्हणजे पासवर्ड लावून लपवून ठेवता येते. आणि त्यामुळे स्मार्ट होता होता तो आपल्यापेक्षा ओव्हर स्मार्ट कधी होतो कळत ही नाही. आपले सगळे विश्व त्याच्यात कैद करून ठेवतो. अगदी स्वतःला ही.
    जग नक्की कोणत्या दिशेने जवळ आले आणि जवळपासचे दूर गेले हे ही मला तुला विचारायचे ? उत्तर तुझ्याकडे असतीलच. ती आपल्याकडे ही असतील कारण स्मार्ट ह्यूमनने त्या स्मार्ट फोनला या हातात आणले. हे मात्र खरे. 

- जुईली अतितकर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

३१. माय मराठी

२५. मोत्यांची माळ

२६. जत्रा