३४. स्वतः ला पत्र
स्वतःला पत्र लिहायला घेतले होते. ते लिहिताना माझ्या समोर होता दूरवर पसरलेला समुद्र आणि त्याला सामावून घेणारा वाळूचा किनारा. समुद्रातून येणाऱ्या लाटा तेव्हा पायावर येऊन आदळत होत्या. पायाशी असणारे दगड , वाळू पायाला स्पर्श करत होते. जसे पुढे चालत होते तसे तसे मागे निशाण ठेवत होते.
लहान मोठ्या लाटा अलगद स्पर्श करून जाताना आपले आणि त्यांचे ओळखीचे नाते आपोआपच तेव्हा तयार करत होत्या. पुन्हा कधी तरी मी तिकडे येईन तेव्हा मला तो किनारा आणि समुद्र अनोळखी वाटू नये म्हणून त्याचा तो प्रकार सुरू असावा.
पायाशी आलेला हर एक दगड मला तेव्हा इतरांपेक्षा वेगळा वाटत होता. रंगाने, आकाराने. त्याच्यातला वेगळेपणा त्या समुद्राने जपलेला होता. म्हणूनच न चमकणारा आणि चमकणारा दगड दोन्ही माझ्या पायाशी होते. हातात घेतल्यावर त्यातलं वेगळेपण त्याला सिद्ध करायचं नव्हतं किंवा नाकारायचं ही नव्हतं. ते तसंच घेऊन तो किनाऱ्याला येऊन थांबलेला. अगदी माझ्यासारखा.
स्वतः विषयी लिहिताना मी पुन्हा त्या किनाऱ्यावर पोहोचते. आपल्याला मिळणारा दगड कधी किनाऱ्यावर विसावलेले शिंपल्यातला मोती असू शकतो तर कधी जमिनीत गाडले गेलेले मौल्यवान रत्न. स्वतः विषयी लिहिताना हा प्रवास अशाच रेतीत अडकलेल्या गारगोटी दगडापासून सुरू होऊन चमकणाऱ्या दगडावर येऊन पोहोचतो. अशा वेळी त्याचे मूल्य ठरवणे हे त्या किनाऱ्यावरच्या रेतीला असते आणि तो जिथे येऊन थांबला, ज्या हातात येऊन पडला त्या कारागिराला असते.
आपण ही कुठे तरी स्वतः ला त्या दगडात पाहतो. हे पत्र लिहिताना किनाऱ्यावरची तीच रेती कधी माझे घर होते आणि मला हुडकत येणारा एक एक जण त्याचा कारागीर होतो. हातातला तो दगड तसाच मुठीत घट्ट पकडून त्याच्या चमकण्याची वाट पाहणे हे च फक्त आता त्या किनाऱ्याच्या हातात आहे. मी तशीच मागे वळते. एक लाट येऊन मागचे सगळे निशाण पुसून टाकते. कदाचित ओळखीचा किनारा तेव्हा मागच्या आठवणी सोडून नव्याने येण्यासाठी सांगत असावा.
- जुईली अतितकर
Comments
Post a Comment