१८. बालदिन विशेष
आदरणीय चाचा नेहरू,
कालच बालदिन झाला. बालपण आणि बालमन आधी पासूनचे आकर्षण. प्रत्येकाच्या आयुष्यात असा दिवस येतो जेव्हा आपल्याला बालपणीचे किस्से आठवतात. नकळत कोणामध्ये तरी ते रंगवले जाते आणि निसटून गेल्याची जाणीव होते. तेव्हा ते पुन्हा अनुभवण्यासाठी एक हक्काची जागा म्हणजे शाळा, त्यातला ही आपला वर्ग किंवा अशाच लहान मुलांनी भरलेला मळा. सगळेच रमतात. क्वचित कधी अपवाद असतात. ते ही कधीतरी बदलतात. अशा रंगीत संगीत मुलांच्या मळ्यात उद्याची स्वप्न रंगवली जातात. आधी कुटुंबाची आणखी पुढे जाऊन सुशिक्षित समाजाची. कदाचित तुम्हाला ही तसेच वाटत होते. आज हे पत्र मी एक विद्यार्थीनी म्हणून लिहिते. वयाने, अनुभवाने कितीही मोठे झालो तरी शिकणे सुरूच असते. तेव्हा विद्यार्थिनीच.
बालदिन म्हणले की आज ही हा दिवस त्याच उत्साहात अनुभवता येतो तो शाळेत आणि वर्गा - वर्गात. ए. पी. जे अब्दुल कलामांनी याच उत्साही उमद्या मुलांना आपले लक्ष केले आणि आपले नाव त्या हर एक मुलांच्या जिभेवर आणि मनावर कोरले गेले. मागे ठेवलेली ही अमूल्य संपत्ती पुढे चिरंतन वाढतच गेली. आपले विचार आणि स्वप्न मुलांमध्ये रंगवणारे आणखी एक व्यक्तिमत्व म्हणजे चाचा नेहरू.
तुमच्याविषयी वाचताना मला लक्षात आले, की खूपदा आपल्याला हवी तशी किंवा सवयीची गोष्ट होत नाही. तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींचे निरीक्षण करणे. त्याचा विचार करून तर्क करणे गरजेचे असते जसे पहा...
सोहम नुकताच त्याच्या शाळेच्या फुटबॉल टीममध्ये दाखल झाला. खेळाची आवड खूप होती आणि सिलेक्शनचा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, तो ही इतरांना दिसत होता. त्याच आनंदात सगळ्यांना खूप मनापासून ही गोष्ट त्याने सांगितली होती. पण काही दिवसातच त्याला जाणवले, आपण शारीरिक दृष्ट्या कुठेतरी कमी पडतोय. जी ताकद लागायला पाहिजे ती कदाचित आपल्यात नाही. अशा वेळी त्या टीम मधून बाहेर पडण्याची भीती त्याला स्वस्त बसू देईनात. त्याचा पडलेला चेहरा त्याच्या आईने लगेच हेरला आणि त्याला कारण विचारले. रडत रडतच त्याने आईला मिठी मारली आणि सगळे बोलून टाकले. आईने त्याला मेंढी आणि मेंढपाळाची गोष्ट सांगितली. गोष्ट जुनीच आहे कदाचित तुम्हाला ही माहिती असेल.
गोष्ट अशी होती, एक कोकरू आपल्या मेंढ्यांच्या कळपासोबत रानात चरत होते. तिथून पुढे तिला हिरवे कोवळे गवत नजरेस पडले आणि ती दूर दूर कळपापासून लांब गेली.
ते गवत खाण्यात इतकी मग्न झाले होते की जवळ येणाऱ्या लांडगा त्याला दिसला नाही. जेव्हा त्याने त्याच्यावर हल्ला केला तेव्हा ते विनवणी करू लागले. " मला आता खाऊ नको. माझ्या पोटात फक्त गवत आहे. जे अजून जिरले पण नाही. तू थोडा वेळ थांबशील तर माझा स्वाद अजून चांगला होईल.
लांडग्याला तेव्हा ही कल्पना आवडली आणि त्याने वाट पाहिली.
थोड्या वेळाने कोकरू म्हणाले " जर तू मला नाचायला दिलेस तर आणखी लवकर गवत पचेल. " यावेळी ही पुन्हा लांडगा राजी झाला.
जेव्हा ती नाचायला लागली तेव्हा तिच्या डोक्यात अजून एक कल्पना आली ते म्हणाले " कृपया माझ्या गळ्यातून ती घंटा घे आणि जितक्या जोरात वाजवता येईल तितक्या जोरात वाजव म्हणजे मी आणखी वेगाने नाचेन."
तेव्हा लांडग्याने जितक्या जोरात जमेल ती बेल वाजवली. तेव्हा मेंढपाळ्याने ती घंटा ऐकली आणी आपल्या कुत्र्यांना हरवलेलं कोकरू शोधण्यासाठी सोडले. भुंकणाऱ्या कुत्र्यांनी त्या लांडग्याला मारले, दूर पळवले आणि कोकराचे प्राण वाचवले.
हे बघ, कोमल आणि दुर्बल कधी कधी भयंकर आणि सामर्थ्यापेक्षा हुशार असू शकतात. तू ही तुझ्या अशा काही बुद्धी चातुर्याने निसटून चाललेली ही संधी पुन्हा मिळवू शकतो आणि आपले स्थान टिकवून ठेवू शकतो. गरज आहे फक्त त्यावर विचार करण्याची आणि तशी कृती करण्याची.
" There is perhaps nothing so bad and dangerous in life as fear "
आपले जीवन हे पत्त्याच्या खेळासारखेच असते. आपल्या हातात जी पाने असतील ती म्हणजे नियती आणि त्याचा वापर करून आपण जसे खेळू ती आपली स्वतंत्र इच्छा. मला वाटते खूपदा आपण आपले पान कोणते असेल यावरच विचार करत वेळ घालवतो. त्याला प्रभावीपणे मांडण्याची कला खूप कमी जणांना माहिती असते. ती आपल्या मनाला बळकटी देते. ती स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहणाऱ्या चाचा नेहरु मध्ये तुमच्यामध्ये होती. आहे !
त्यामुळेच इतिहास रचला आणि त्यात आपले संस्मरणीय स्थान निर्माण झाले. इतिहासात आजवर वाचलेले असंख्य स्वातंत्र्य संग्राम, लढाई, युद्ध आज ही अंगावर शहारा आणतात. भिंतीवरची चित्रे बदलली तरी आपण इतिहासात दडलेले सत्य बदलू शकत नाही. या दूरदृष्टीने पाहिले तर सिनेमातली फायटिंग आणि व्हिलन त्या समोर क्षुल्लक वाटू लागतात. संघटित समाज आणि उत्तम लोकतंत्र आणि कार्यमग्न व्यक्ती हीच खरी समाजाची शक्ती असते असे बरेचदा तुमच्या भाषणात आलेले आहे. खरे तर आज ही मूल्ये विभागलेल्या समाजाला पुन्हा एकत्र आणण्यासाठी आपण आणखी एकदा वाचावी. त्याच्यावर विचार केला पाहिजे, आपल्या जीवनाचे हित कशात आहे तुम्ही समाजाला वेळोवेळी सांगितले. एक सक्षम आणि राजकारणासोबत समाजकारणात गुंतलेला नेता आजही आपल्या देशाला हवा आहे.
खाकी कोटवरचे गुलाब जसे तुमच्या उत्साही विचारांची जाणीव करून देते आणखी शोभा वाढवते तशीच पुढची पिढी त्या गुलाबाप्रमाणे फुलत बहरत राहावी.
- जुईली अतितकर
आठवणीतील बालपण, पत्ता, नियती आणि ती गोष्ट सगळं छान लिहिले🌸👌
ReplyDeleteधन्यवाद ओमकार
DeleteBeautiful....khupch mast lihilay
ReplyDeleteदिवसागणिक तुझ लेखन दांडग होतेय....खूप छान...
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद सर 🙂
Delete