१३. पानगळ
आज ऑफिसमधून निघताना नेहमी प्रमाणे हात सेनीटायसरने स्वच्छ केले. मास्क लावला आहे माहीत असून ही पुन्हा त्याची ही शहानिशा केली. सोबतच्या मैत्रिणींनी ही पुन्हा आठवण करून दिली. या स्वच्छता मोहिनेनंतर मी माझ्या घरच्या वाटेला आणि माझ्या मैत्रिणी त्यांच्या वाटेला वळले. थोड्याच अंतरावरून ऑटो मध्ये बसले. ऑटो ही प्रोटेक्शन प्रूफ वाटत होती. पुढे बसलेला चालक आणि मागचे पॅसेंजर यात मोठी प्लास्टिकची भिंतच होती. ज्यातुन आवाज ही पलीकडे जात नव्हता आणि हे ही मी त्या ऑटोमधून उतरताना जाणवले. जेव्हा मी माझे उतरण्याचे ठिकाण आल्यावर ही दोनदा सांगून त्यांनी त्या प्लास्टिकच्या भिंतीवर हात मारल्यावरच रिक्षा थांबवली.
मी आणि माझ्या सोबत एक सावळीशी महिला आणि तिची चार वर्षाची मुलगी बसले होते. ती महिला कामावरून सुटून आलेली मजूर असावी. तिच्या माझ्या मध्ये तीची मुलगी बसलेली. ती ही थोडी सावळीशी आणि बुटकी. एका हातात स्ट्रॉबेरी फ्लेवरचे आईस्क्रीम आणि दुसऱ्या हातात चमचा. मास्क लावला तो ही हनुवटीला. थंडीचे दिवस आणि बाहेरचा गारठा पाहता आईस्क्रीमचा मोह म्हणजे आजाराला आमंत्रण तरीही ती तो मास्क बाजूला करून त्या हातातले सुख एन्जॉय करत होती. मधूनच तिला शिंका ही आल्या तरीही ती रमली होती. मला थोड्या वेळासाठी ऑफिस मध्ये आपण रोजचा निघायचा दिनक्रम आठवला. मला आज तिला पाहताना मधूने सांगितलेला अनुभव आठवला.
मधु...ती रिपोर्टर आहे, बातम्या देणे आणि त्यावर चर्चा करणे हे तिचे आवडते काम. तिचे पूर्ण नाव मधूमालती. पण घरी, शेजारी सगळेच तिला मधु म्हणून ओळखतात. मधुला एक सवय होती. तिला भेटलेल्या आणि आवडलेल्या व्यक्तीकडून ती एक पत्र लिहून घ्यायची आणि ते स्वतः जवळ ठेवायची. त्याच ती काय करायची हे तिने कधीच सांगितलंच नाही पण तिची ही सवय बऱ्याच जणांना खटकायची तरीही तिचा हा छंद काही ती सोडत नव्हती. तिला फिरायची आवडत होती. आणि त्यातून कोणी अवलिया भेटले तर ती लगेच त्यांच्याशी मैत्री करून त्यांची पत्र ती जमवायची ती जिथे जाईल तिथे ती पत्र सोबत न्यायची. वेळ मिळेल तस वाचायची. एकदा कामानिमित्त परगावी गेल्या असताना एक अशी घटना घडली जी कायम तिच्या समरणात राहिली.
सोनल तिला तेव्हा भेटली. एका सामाजिक संस्थेमध्ये काम करणारी महिला. तिचा मुलगा रघू आणि सासू सासऱ्यांसोबत ती राहत होती. घरी बेताची स्थिती होती. एका मुलाखती दरम्यान तिची सोनलशी ओळख झाली आणि लगेच मैत्री ही झाली. मधूची तीन दिवसांची विझिट होती आणि त्या संस्थेच्या आवारात मधूची राहण्याची सोय केली होती. एकदा सोनलने मधूला घरी जेवायला बोलवले असताना तिच्या मुलाची, रघुची भेट करून दिली. त्याचे नाव होते रघुवीर पण सोनल त्याला रघू म्हणूनच बोलवायची. रघू वयाने लहान होता. चार पाच वर्षाचा असेल. खेळता खेळता त्याने मधूच्या बॅग मधून सगळी पत्र बाहेर काढली आणि त्यातच तो खेळत बसला. सोनलने ते पाहिले आणि त्याला ओरडून बाजूला केले. मधुची सगळी पत्र एकत्र करताना तिला एक पत्र मिळाले. त्यातुन बंदुकीची गोळी पडली जी रघुच्या हातात होती. ती बंदुकीची गोळी त्या पाकिटात परत टाकताना तिने ते पत्र बाहेर काढले. मधूला विचारले " ही पत्र कोणाची ? आणि त्यात ही बंदुकीची गोळी ?" म्हणली " हा एक वेगळाच अनुभव होता. मी जवानांना भेटायला गेलेले तेव्हाची आठवण. ते पत्र ज्याने लिहिले त्याचं नाव " अमर " नाव ऐकताच सोनल चमकली. तिने ते पत्र पाहिले. त्या गोळीवरून आणि जवानांचा उल्लेख म्हणजे ते पत्र लिहिणारे रघुचे वडील होते. त्याचे वडील सैन्यात होते. पण त्यांचे पत्र मधुकडे कसे ? विचारल्यावर तिने तिच्या रिपोर्टिंग मध्ये सीमेवरच्या जवानांची घेतलेली मुलाखत दाखवली. इतके दिवस कोणताही संपर्क नसताना अचानक आपला माणसाने लिहिलेलं पत्र पाहून सोनलने रघुला कुशीत घेऊन रडायलाच सुरवात केली. सोनल जवळ मोबाईल किंवा कोणतेही संपर्काचे माध्यम नव्हते. ती एका खेड्यात वाढलेली होती. त्यामुळे रेडिओ सोडला तर ती जगापासून चार हात लांबच असायची. मला यांना भेटता येईल का असं तिने तिच्या कापऱ्या आवाजात विचारले तेव्हा मधुला तिला नाही म्हणणे शक्य नव्हते. त्या पत्रात नक्की काय लिहिले हे जाणून घेण्यासाठी ती उत्सुक होती. मधूने ते पत्र वाचायला सुरवात केली.
" मी सुखरूप आहे, अशीच सुरवात करतो. सवयीने हे ऐकणे तुला आवडायचे आणि एका सैनिकाच्या घरासाठी आणि घरच्या सगळ्यांसाठी ते असतेच. मला हे पत्र ताईने आठवण म्हणून लिहायला सांगितले पण ते लिहिताना मला घरच्यांचे चेहरे समोर दिसू लागलेत. त्यामुळे मी माझ्यापेक्षा त्यांच्यासाठीच हे पत्र लिहीन. सोनल, तुझ्याकडे सध्या माझ्याशी बोलण्यासाठी कोणतेही माध्यम नाही. मी पाठवलेली पत्र तुला मिळतील तेव्हाच माझी खुशाली कळेल आणि ते ही किती दिवसात मिळेल हे ही ती विठू माऊली जाणो...तू आणि रघू माझ्या आयुष्यात आलात तसे काहीच दिवसात मी इथे आलो. सीमेवर लढताना माझं येणार कोणतं पत्र शेवटच असेल मला ही माहिती नाही. माझं हे पत्र ताईने तुला वाचून दाखवलं तर मला ही इथे युद्ध जिंकल्याचा आनंद होईल. भेट म्हणून तरी काय द्यावे असा प्रश्न पडला तर माझ्या समोर रोखलेली बंदूकच दिसली म्हणून या लिहिलेल्या पत्रासोबत एक बंधुकीची गोळी आणि आपल्या छोट्या जवानासाठी माझीच टोपी पाठवत आहे. त्या गोळीचा रोख कधी शत्रूवर असेल तर कधी तो माझ्यावर ही असेल. माझे संरक्षण म्हणजे ती हिरवी टोपी आणि ती गोळी जसे तिथवर पोहोचेल तेव्हा मी इथे सीमेवर एक लढाई जिंकलेली असेल. त्या दोन्हीला सांभाळा,
तुमचा सीमेवर लढणारा बाबा.
" अमर "
ते पत्र ऐकता ऐकताच रघू झोपला. सोनल ते पत्र आणि त्यासोबत पाठवलेली भेट आपल्या उशाशी घेऊन झोपली. दुसऱ्या दिवशीच मधूला रिपोर्टिंग करायला जायचे होते. जाताना रघुने तिला एक आईस्क्रीम दिले आणि म्हणला " बाबांना सांग तुमची बंदुकीतली गोळी मिळाली. हे आईस्क्रीम मी ही खातो तू ही घे आणि त्यांना ही एक घेऊन जा." मधु निघाली आणि त्या आईस्क्रीमकडे पाहत राहिली. रखरखत्या उन्हात आणि प्रवासात ते वितळणार हे तिला माहिती होते, त्यामुळे तिने ते वाटेत एका फुगे विकणाऱ्या मुलाला देऊ केले. तो मुलगा खुश झाला. फुगे बाजूला ठेवून प्रखर दुपारच्या उन्हात ते आईस्क्रीम खाऊ लागला आणि ती ही निघाली. निघताना तिचा फोन वाजला " रिपोर्टिंग करायचे आहे, नुकतेच सीमेजवळ गोळीबारात दोन जवान शहीद झाले त्यातले एकाचे नाव होते " अमर "
गोष्ट इथे संपली नाही, ती त्या आईस्क्रीम खाणाऱ्या लहान मुलाकडे, फुगेवाल्याकडे बघत होती. आईस्क्रीम खाताना ते ज्या व्यक्तीसाठी होते. त्याला ते मिळालेच नाही. ती बंदुकीची गोळी ज्याने आपली निशाणी म्हणून पाठवली होती. त्या घरचे कालचे दोन दिवस या पुढे तसेच असतील का ? ती व्यक्ती आज आपल्यात नाही म्हणल्यावर त्या घरचा छोटा जवान ते आईस्क्रीम त्यांना भेटले की नाही विचारल्यावर काय उत्तर द्यायचे ? रघू असाच कधी समोर आला तर...आणि सोनल ? निघताना तिला त्या फुगे विकणाऱ्या मुलाने तीन फुगे दिले. म्हणला " फुगे आकाशात असेच सोडून द्या ताई, त्यांना मोकळे आकाश आवडते. "
आज ती मुलगी ऑटो मधून उतरताना तिची आई तिला तो मास्क लावण्यासाठी ओरडून सांगत होती. पण तिच्या हातचे आईस्क्रीम आणि त्यातून तिला मिळालेला आनंद तिच्या हनुवटीवरचा मास्क वितभर ही वर करू शकला नाही. जेव्हा ते आईस्क्रीम पूर्ण संपले तेव्हाच तिने आपले तोंड झाकले. मग ती ही उतरली आणि मी ही.
आपल्या आजूबाजूला फिरणारे विश्व असेच बदलत असते. आठवणी जमा होत असतात. काही हिरव्या पानाप्रमाणे फांदीला धरून राहतात तर काही फिकी होऊन गळून जातात, तरीही त्याचे नव्याने बहरणे सुरूच असते. पानगळ झाली तरीही.
- जुईली अतितकर
एक आगळं वेगळं पत्र आणि निःशब्द करणाऱ्या ऱ्भावना!
ReplyDeleteभावलं दीदी, फार सुंदर🦚🌸👍🏻❤️
मनःपूर्वक धन्यवाद ओमकार.
Delete