१५. आदरणीय तिरंगा

        आज तुला पत्र लिहिते, " तिरंगा " आपला झेंडा. सगळयात आधी तुला ७४ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ७५ व्या नव्या कोऱ्या वर्षात स्वागत.

       स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आज जागो जागी साजरा होत असेल. तू  या स्वातंत्र्याचे प्रतीक कुणाच्या छातीवर, कोणाच्या खांद्यावर, कोणाच्या काठीवर, कोणाच्या गाडीवर तर दुकानाच्या फळी वर असशीलच. 

     तुला आज थोडे वेगळे वाटते का रे ? म्हणजे पंचाहत्तर वर्षांपूर्वीचे स्वातंत्र्य आणि आजचे स्वातंत्र्य. तेव्हाचा लोकांचा दृष्टिकोन आणि आताचा. पिंजऱ्यातून बाहेर पडण्याचा आनंद. परिस्थिती तेव्हा ही बिकट होती आता ही होती. 
तेव्हा माणसापासून माणसाला स्वातंत्र्य मिळाले होते. आज दूर राहून पुन्हा एक होण्यात ते दिसते. बलिदान तेव्हा ही दिले; आज दिले. एक दोन नाही लाखोंनी. 

      आजचा पाऊस स्वातंत्र्यासोबत काही बंधने घेऊन पडतोय. दऱ्या खोऱ्यातून आज ही वारा वाहतो, आज त्याला श्वासांची किंमत आली आहे. हिमालयाच्या टोकावर आज ही तू दिसतोस. पण शाळेच्या पटांगणावर " जय हिंद " चा नारा बरेच दिवस ऐकू येत नाही. 

     कधी कधी असेही वाटते, प्रत्येक लढाई ही माणसाशी माणसाची नसते. प्रत्येक लढाईत बंदुका आणि तलवारी कामाला येत नाही. प्रत्येक लढाई ही सीमेवरच लढली जात नाही. 

     कधी आपली आपल्याशी च लढाई असते. चार भिंतीत राहून ही ती जिंकता येते. कधी कधी प्रार्थना आपले सगळ्यात मजबूत हत्यार बनते. कधी कधी लढाई सीमा पाहत नाही आणि ती फक्त जिंकायची असते. 

    आज तुला हातात घेताना, दुरून मान वर करून तुझ्याकडे पाहताना पुन्हा जिंकल्यासारखे वाटते. आणि का वाटू नये; श्वासांची लढाई जिंकलो, जगण्याची लढाई जिंकलो, पिंजऱ्यात राहून मुक्त वाहण्याची लढाई जिंकलो, दूर राहून एक होण्याची लढाई जिंकलो, गेल्या तीन चार वर्षात पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई जिंकलो. 

    तेव्हाचे लावलेले एक रोपटे आज नव्याने पुन्हा लावायचे आहे. फक्त लावायचे नाही तर वाढवायचे आहे. ही लढाई माणसाशी माणसाची नाही तर  माणसांची जगण्याची आहे. हे तू मान वर करून पाहताना सगळ्या जगाला ऐकायला लावलेस.म्हणून आज तुला हे सांगण्यासाठी लिहिलेले पत्र. 

तुझी शान आणि बलिदान सतत प्रत्येकाच्या मनात तितक्याच उंचीवर राहो. इतकेच.

- स्वतंत्र देशाची एक नागरिक
      जुईली अतितकर


Comments

  1. सुंदर! जय हिंद!

    ReplyDelete
  2. खूप छान जुईली

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिले आहेस जुईली....तुझ्या लेखनात एक वेगळीच शैली आहे....खूप मस्त....असेच लिहित रहा....तुझ्याकडुन इतर लेखक प्रेमिंमध्ये लेखनाची गोडी निर्माण होईल....👍👍👍👍😊😊😊😊

    ReplyDelete
    Replies
    1. जय हिंद🌸
      नक्कीच
      Thanks 😊✍️
      आवर्जून लिहिते व्हावे हीच सदिच्छा

      Delete
  4. खुपच छान. जय हिंद!

    ReplyDelete
  5. अप्रतिम, लेखन

    ReplyDelete
  6. सुंदर... तिरंग्या साठी तुझी लेखणी तीन पटीत आणि तीन रंगात फुलल्या सारखी जणू काही वाचताना वाटले..
    Keep it up.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks निखिल सर ✍️
      जय हिंद🌸

      Delete
  7. खूप सुंदर मॅडम

    ReplyDelete
  8. खूप सुंदर 👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

३१. माय मराठी

२५. मोत्यांची माळ

२६. जत्रा