१६. बाप्पाचं पत्र
सकाळ सकाळी whatsapp वर नोटिफिकेशन आलं होतं. Unsaved नंबर वरून एक भला मोठा मेसेज. लेख, कथा नव्हे पत्र...कोणाचं?
पत्रात लिहिलं होतं...
कशी आहेस गं " best friend " ?...
वाचून मी पण आश्चर्य चकित, पुढे काय लिहिले होते माहितीये...मी वाचतच राहिले.
किती दिवसापासून मी तिथे तुझ्या वहीच्या मागच्या पानावर बसून होतो. किती तरी वेळा ते पान उघडून तू बरंच काही म्हणाली असशील. हसली असशील, रडली असशील. पूर्ण वही भरली तरी फक्त त्या शेवटच्या पानासाठी ती वही तू हाताशी ठेवलेली. सकाळी, रात्री, मध्यरात्री कधीही आठवण आली की उघडून बसतेस. तुला समजवायच्या आधीच मग ती वही बंद करून बाजूला ठेवून देतेस. मी ऐकतो आणि तुझं सगळं!
म्हणलं आजपर्यन्त ऐकलेले त्यात लिहिलेले सगळ्याची तुला उत्तर तरी द्यावी. तू त्या वहीसोबत हे हिरवं अँप पण वापरते. लाल पोस्टाची ती टाळे लावलेली पेटी आज काल या रंगीबेरंगी अँप्स मध्ये बदलली आहे. मग म्हणलं त्या लाल पेटीची वाट न पाहता या सुपर फास्ट हिरव्यागार अँप वरच माझं पत्र पाठवतो.
आधी लहानपणी बघ, सण जवळ आला की पोस्टाची ती पेटी भरभरून वाहायची. त्यातला एक कागद आपल्या नावाचा असायचा. गावी गणपती येणार ? तुम्ही येणार ना..वाट पाहतोय ची प्रेमळ हाक त्यात ते पत्र घेऊन यायचे. आधी खुशाली आणि मग आग्रहाचे बोलावणे. त्या पत्राला घरच्या प्रत्येकाने वेगवेगळ्या हस्ताक्षरात दिलेलं उत्तर. मोठ्या पासून ते लहानांपर्यंत सगळ्यांच्या अक्षरावरूनच त्याची खुशाली समजायची असे काहीसे जादूचे ते पत्र असायचे आणि ती जादूची पेटी. आज या पेटीत मी पण बरंच काही आणलं आहे, तुझ्यासाठी ?
खूप दिवसात तू फुललेली वेगवेगळी फुलं आणि त्यावरचे भिरभिरणारी फुलपाखरं पाहिली नव्हतीस ना, आज बघ तुझ्या गॅलरीमध्ये सगळी फुलं फुललेली असतील आणि ती फुललेली बाग तुझ्या लगेच नजरेसमोर असेल. तुझ्या कायम सोबत राहील. कधी परत पहावं वाटलं तर बिनधास्त त्या बागेत जाऊन ये. बरीच फुलं आहेत, छोटी, मोठी, काही झुपक्यात, काही स्वतंत्र, प्रत्येकाच्या वेगळ्या तऱ्या आणि स्वभाव.
अचानक कधी तरी खूप भूक लागते. एखादा आवडणारा पदार्थ डोळ्यासमोर येतो. समोर अचानक मिळावा असं वाटतं ना, पण कष्ट करून त्याची रेसीपी शोधण्यातच वेळ जातो. भूक कुठच्या कुठे पळून जाते. जिभेचे चोचले पुरवता पुरवता पोट आणि मन रुसून बसते मग पुन्हा किचन मध्ये जाऊन एक खण प्रेमाने उघडायचा. त्यात आपणच पहिल्यांदा कुकरच्या तीन शिट्यांवर शिजवलेला भात, सगळ्यांसाठी केलेला कमी जास्त साखरेचा चहा. तीन चार वेळा एकच पीठ घेऊन लाटलेली पोळी. गोडाचा शिरा किंवा पोहे असतील. सगळ्यांना आवडलेल्या, भरभरून कौतुक झालेल्या डिश समोर येतील. काही फसलेल्या ही रिसायकल बिन मध्ये असतील तर काही सजवलेल्या गॅलरीमध्ये.
तुझी झोळी किती भरलेली आहे ? किती भरायची आहे. किती शिल्लक आहे. तुझ्या एकाच खात्यावर किती वेगवेगळी इन्व्हेस्टमेंट आहे ते ही तुला समजेल. काही एक दोन मिनिटांची, काही दोन वर्षांची, काही कायमची लक्षात राहिलेली. " जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी " आठवणीतले एक पान वाचून बघ. तुझेच ते. मी तर सगळी ऐकली. तू विसरून जाशील कदाचित. त्यातले पहिले पान नेहमी कोरं असतं ना ... काही अगदीच आवडीचं पण अचानक हुकलेलं ... मिळण्याच्या प्रतीक्षेत ठेवलेलं ते पहिलं कोर पान.
खरं सांगू का प्रत्येकाच्याच आयुष्यात ते एक पान कोर असतंच. काहींची जास्त ही असतात कोरी पानं, काही जण ते विसरून पुढच्या पानावर काही तरी भारी लिहायला मिळेल म्हणून पालटत जातात. काही तिथेच थांबतात. काही जण ते पान विसरून ही जातात आणि सगळी पान संपतात. नवी वही येते, त्याचा ही "श्री गणेशा" होतो. तरीही ती वही सोबत असते, कायमची. तुझ्या नंतरच्या सगळ्या पानांवर त्या कोऱ्या पानांचे उत्तर असेल कदाचित. आणि शेवटच्या पानावर मी ...
कायम तुझ्या मागे...
तुझा " best friend "
🌸 " गणपती बाप्पा "🌸
Comments
Post a Comment