१७. चार दिवे
एक दिवा हातात आणि एक लांब दिव्यांची रांग शेजारी. हातातला दिवा सगळ्यांच्या सोबत रांगेत ठेवतेच म्हणे पर्यंत विझला. पुन्हा ती वात पेटवण्यासाठी मी काडेपेटी आणायला आत गेले. तो दिवा तसाच शेजारी ठेवलेला. येऊन पाहते तर दिव्याची ज्योत पेटलेली. जादूच झाली म्हणत आत गेली तर तो दिवा लावला होता आईने. शेजारच्या रांगेतल्या पणतीनेच. परत बाहेर आले तर त्या पणतीची ज्योत कमी करते; तसा त्यातुन चराचर आवाज झाला. जवळ गेले तर ती म्हणते. " इतक्या लांब का गेलीस " शेजारचा दिवा " ; तो ही माझ्यासाठी पुरेसा होता. "
काही तरी ऐकायचे अजून राहिलेले म्हणून थांबले तर वेगळीच चर्चा तिथे चार दिव्यांची रंगली होती. कदाचित तुम्हाला ही ऐकायला आवडेल...
" आज खूप दिवसांनी प्रकाशात आला तो कट्टा. तो उंबरठा. तो आणखी एक कोपरा. मागच्या वर्षी तिथे एक कंदील पण होते. यावेळी आपण चार दिव्यांनी त्याची जागा घेतली बहुतेक. जरा उंबऱ्यातुन वाकून पाहावे तर किती दिवसांनी शेजारची, त्याच्या शेजारची सगळीच गल्ली प्रकाशात आली होती. या वेळी थोडीशी कमी रोषणाई होती. पण एका घरातला एक दिवा असे करत सगळंच दिपलेलं छान दिसत होतं. दिवाळीच्या रंगात सगळेच कोपरे रंगले होते. तपकिरी सारवण आणि त्यावर पांढरी शुभ्र ओळ त्यात भरलेले रंग आणि प्रेम. इकडे बघ उंबऱ्यात हा एक कोपरा आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा रंगला. आपल्या चार दिव्यांच्या प्रकाशात त्याचे रंग किती उठून दिसतात ना. नाहीतर गेले किती तरी दिवस तो बंद दारच पाहत होता. तो कोपरा आणि हा कट्टा... खरंच काय काय छान दिसू लागलं. खिडकीच्या आडोशाला असलेले दोन मोठे दिवे सतत बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्याला वाट दाखवतात. जणू काही " या... तुमचीच वाट पाहतेय घर " अशीच आरोळी देत असतील.
तिकडे दूरवर एक पणती आपली वाट बघते अजून चार पणत्यांच्या सोबत. तिला आपण इथे बोलवण्यापेक्षा तिथेच जाऊया का ! त्यांच्याकडे तेल वात असेल ना. असेल असेल. तिथूनच बेसनाच्या लाडूचा घमघमाट येतो. खंमग भाजणीचा दरवळ इथवर येतो. पण ती पणती अजून पेटली का नाही पहायला हवे. कदाचित त्यांनी आपले आयुष्य इतरांच्या सुखासाठी, मुलांसाठी तेल वाती प्रमाणे प्रकाशमान करण्यात घालवले. ती पणती आणि तो दिवा यावेळी त्यांच्या सोबत नसावेत. तिथून सीमेवरच्या घडामोडी आणि देशभक्ती गाण्याच्या लहरी सतत वाहत असतात. कुठेतरी सीमेवर असेल किंवा पांढरा कोट घालून कोणाची जीवन ज्योत तेवत राहण्यासाठी ते झटत असतील. तिथे आपण गेले पाहिजे. त्या चार पणत्या आपली वाट पाहत आहेत. तिथून दुसरेच घर अगदी रिकामे झाले. तिथला आनंद अचानक त्यांच्यातून निघून गेला. तिथे ही एक ही दिवा नाही. हरवलेला आनंद पुन्हा येतच असेल. त्याला वाट देऊ. एकटा कंदील वर आकाशात पाहत तिथे उभा आहे. त्याचे तेज आताशा त्या खिडकी पुरतेच राहिले आहे. तिथे ही जाऊन येऊ. तिथून येता येता बाहेरच्या मंडईत डोकावून येऊ तिथे कॉर्नरलाच एका ताईने तिच्या हाताने काही दिव्यांना रंगवले आहे. तिच्याकडे दोन पुस्तके द्यायची आहेत. ती दोन पुस्तक इथे मी कितीतरी वेळा पाहिली. परवा भाजीवली इथे संगत होती. ती ताई दहावीला आहे तिला हवी असतील तीच कदाचित. तिला ही भेटून येऊ. ताईच्या घरची दिव्याची रोषणाई आणि मंडईतली रोषणाई फरक आहे खरंतर पण तिला तो फरक जाणवणार नाही. यासाठी प्रयन्त तर करूया. हो ना...
दिव्या दिव्या दिपोत्कार...कानी कुंडले मोती हार...दिव्याला देखून नमस्कार...देव्हाऱ्यातल्या लामण दिव्यासमोरची प्रार्थना होणार इतक्यात आतून आवाज आला " फराळाचे ताट शेजारी देऊन ये ग ..." आत जाऊन फराळाचे ताट घेऊन बाहेर येतच होते पुन्हा आत गेले आपल्या कडचे चार दिवे सोबत घेऊन पूर्ण मंडई पर्यन्त फिरून आले. किती तरी वेगवेगळ्या दिव्यांची दिवाळी पाहून आले. किती तरी उंबरठे, कोपरे प्रकाशात आले होते. काहीतरी वेगळेच दिव्यांचे गाऱ्हाणे ऐकून आले होते. अशी दिव्यांची दिवाळी साजरी झाली होती.
- जुईली अतितकर
❤️❤️
ReplyDeleteसुंदर .... माईंड ब्लोविंग...
ReplyDeleteThanks dada ...ही प्रतिक्रिया भारी गिफ्ट आहे.😊
Delete😍❤️✨
ReplyDeleteही चार दिव्यांची संवेदना आहे, त्या ठिकाणासाठी जिथे दिवे नाहीत ( मोठया अर्थाने की जिथले दिवे - वंश (सैनिक, डॉक्टर ) देशसेवेसाठी मालवले आहेत, जिथे दारिद्र्यामुळे दिवे लागतच नाहीत, जिथे केवळ वृद्धच राहतात, तिथले दिवे क्षीण झाले आहेत ). सुंदर मनोगत. - आशिष
ReplyDeleteThanks आशिष
Deleteअगदी बरोबर निष्कर्ष आला आहे.
दिव्यांची संवेदना
आवडले...
दिव्याचं मनोगत फार सुंदर आणि आशिष यांची प्रतिक्रियाही आवडली .
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद ma'am😊
Delete