२१. अरुंद वाट
ऑफिसच्या रस्त्यात येणाऱ्या वाटेत एक छोटीशी बाग लागते. कधी कधी खूप कंटाळा आलाय असं वाटलं, की चाळणी सारखी ती वाट होऊन जाते. बरेचदा असं होतं की, त्या बागेतून पलीकडे जायचे असते. अगदी पाच ते सहा मिनिटांची ती अरुंद वाट असते. पण त्या पाच ते सहा मिनिटांत चेहऱ्यावरचा ठसठशीत जाणवणारा कंटाळा पालटून त्यावर उत्साहाचे, उत्सुकतेचे, प्रसन्नतेचे तेज जाणवते.
मनातून चेहऱ्यापर्यन्तचा हा प्रवास म्हणलं तर फार कठीण आणि मोठा असू शकतो. पण तेव्हा फक्त ते पाच ते सहा मिनिटांचे अंतर असते. हिरवा गच्च भरलेला एक रस्ता माझ्या वाटेतून जातो याचे नवल ही वाटते आणि कौतुक ही.
पुढचा प्रवास कसा असेल हे माहीत नसताना तो मधला दुवा पुढे जाण्याची माझ्या मनाची तयारी करतो. कधी धो धो पडणाऱ्या पावसात भिजलेला असतो तर कधी सुकलेल्या पानांच्या पायघड्या घातलेला.
अगदी मिनिटाभरासाठी नजरेस पडणारे काळ्या, निळ्या ठिपक्यांचे फुलपाखरू ही तेव्हा सुखद वाटते. त्याचे पंख कधी आपले पंख होतात कळत ही नाही. लहान मोठी फुलपाखरे तेव्हा मला आजवर भेटलेल्या अशा अनेक रंगांची आठवण करून देतात जेव्हा आपले मिटलेले ओठ हसण्यासाठी, आनंदासाठी कोणासोबत, कधी तरी दाराप्रमाणे उघडले होते. तेव्हाची ती आठवण उगाच अशा वेळी आपोआप चेहऱ्यावर पुन्हा तेच हास्य आणते. नकळत. ती झटकन उडणारी फुलपाखरे आपल्या आयुष्यातील येणाऱ्या हर एक दिवसाची, चांगल्या वाईट अनुभवाची आणि सर सर पळणाऱ्या घटकेची जाणीव करून देतात.
जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले
अस्ताचलास जेथे रवी बिंब टेकलेले
जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्यावा
ही वाट दूर जाते स्वप्ना मधील गावा...
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी अगदी थोड्या वेळासाठी येणारी वाट असते जी कपाळाच्या आठयांचे रूपांतर स्मित हास्यात करत असते. अशा वेळी तोच तो रटाळ वाणा प्रवास ही नवा नवा होऊन जातो. ती वाट येण्या जाण्याच्या वाटेत असेल तर सोडू नये. कारण तोच तो रस्ता असला. तरी मधली पाच मिनिटांची ती वाट प्रवासातले महत्वाचे वळण असू शकते. तिचे हे वेगळेपण रस्ता बदलला की जाणवतं राहते. कायम.
- जुईली अतितकर
😍💖
ReplyDelete🙌❤️
ReplyDelete