२२. कवितेच्या पलीकडे
आदरणीय शांता शेळके,
सायंकाळी क्षितिजावरती
मंदपणे मी करते लुकलुक
शांत राहुनी अपुल्या जागी
भवतालचे बघते कौतुक
अफाट वरती गगन पसरले
विशाल खाली पसरे धरती
मी सृष्टी ची सुता लाडकी
चमकते क्षितिजावरती
साहित्य सागरात शांता बाई तुमचे वर्णन करायचे झाले तर याहून वेगळे होणार नाही. कधी क्षितिजावरचा लुकलूकणारा तारा, तर कधी साहित्याच्या समुद्रात तटस्थ असलेला एक प्रकाश स्तंभ. आम्हा तरुणांसाठी साहित्यिक नाव घेऊन विहार करणाऱ्या युवकांसाठी खोल साहित्य सागरात दिशा दाखवणारा दिशा दर्शक.
संधी प्रकाशात धावत्या घटनांचे आल्या गेल्याचे, कालचे, उद्याचे कौतुक सोहळे पाहताना एका ठिकाणी क्षितिजावर स्थिरावणारी नजर आणि चमकणारे काही आपलेसे वाटते. मन बुद्धी ला मागे टाकत सृष्टीच्या आनंदात आपला आनंद शोधू लागणारा मंद मंद तेजाळत जाणारा तिचा प्रकाश अढळ भासू लागतो. आणि त्याच प्रकाशात आपली एक शब्दाची जुळणी सुरू होते. ती ही क्षितिजाचा ठाव घेत घेत शांता बाईच्या शब्दांत गुरफटून जाते. समरस होते.
तुम्ही लिहिलेली प्रत्येक कविता, गीत, समीक्षण आज ही वाचताना ते माध्यम होते. संवादाचे आणि कथनाचे. ज्याप्रमाणे मातीच्या घागरीचा गुण धर्म असतो पाण्याची ओल आपल्यात सामावून घेण्याचा. आणि त्या आधारे आतील पाणी थंडगार करण्याचा. अशा वेळी एखादा तहानलेला पांथस्थ यावा आणि घोटभर घागरीच्या पाण्याने त्याची तृष्णा तृप्त व्हावी. तशीच तुमची लेखणी काहीशी बोलते. साहित्याची ओल आपल्या अंतरंगात सामावून घेऊन पानावर उतरते. घागरीला मिळणारे विविध अंगी, विविध रंगी साहित्य प्रवाह त्या घागरीला सुखावतात. गावच्या वेशीवर चालताना जशी कधी कोणाच्या खांद्यावर तर कधी कोणाच्या डोक्यावर ही घागर जाते. तसेच तुमचे शब्द कवेत उचलुन घेतात. स्मरणात राहतात. कधी जात्यावर दळण दळणारी बहिणाबाई तर कधी रानावनात विहार करणारी घनराणी तुमच्या कवितेतून डोकावते. कवितेतुन लिहिताना जसे तुम्ही म्हणले आहे;
" कुठले पुस्तक कुठला लेखक
लिपी कोणती कसले भाकीत
हात एक अदृश्य उलटतो
पानामागून पाने अविरत "
लिहिणारे सारे त्याचे मन आहे जे कोणत्याही नियमाला, बांधनाला न जुमानता पानावर उतरत जाते. त्याला भाषा किंवा ओळीची सीमा नाही. हा प्रवाह अविरत सुरू राहतो. पाने भरत जातात.
कधी तुमच्या कविता वाचताना, तुमच्या दृष्टीने कवितेला पाहताना मी भूतकाळात रमते. तुमच्याशी कवितेचा संवाद सुरू असतो. तेव्हा एक प्रेमळ आजी मला भेटते. हिरव्या चुड्याची, नववार साडीची आणि मायेने भरवलेल्या दूध भाताची आठवण मला होते. शांता बाई तुमची लिहिलेली " पैठणी " वाचताना काहीसे गलबलुन येते.
कधी तरी ही पैठणी
मी धरते उरी कवळून
मऊ रेशमी स्पर्शा मध्ये
आजी भेटते मला जवळून
मधली वर्षे गळून पडतात
काल पटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यानो
आजीला माझ्या कुशल सांगा ....
शांता बाईंनी कवितेला अशी काही मखमली पैठणी नेसवली आहे, की आज ही त्या शब्दावरुन नजर फिरवली की आपसूक काळाची भिंत नाहीशी होते आणि पैठणीच्या मऊ रेशमी पदराअडून सर सर आठवणीतली आजी दिसू लागते. आजीच्या जवळ नेण्याचे हे प्रयोजन भविष्य आणि वर्तमानाला भूतकाळाशी जोडू पाहते. नात्यांची ही रेशमी बांधणी शांता बाई आमच्यासाठी क्षितिजावरचा चमकणारा तारा आहे असे म्हणावेसे वाटते. सरते शेवटी या आंनद यात्रेचा प्रवास करताना त्यांचे दुःख ही किती समंजस होते जे कोणताही तत्सम भाव, दुराभाव न ठेवता कवितेत उतरत जाते हे गोंदण या संग्रहातील कवितेत तुम्ही मांडले आहे.
दुःख समंजस माझे
नाही फिरविली व्दाही
कधी आले आणि गेले
मला कळलेही नाही
मला कळलेही नाही
उरे पुसटशी खूण .
फक्त फिकट चांदणे
फक्त मंदावले ऊन.
प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःखाचा ऊन सावलीचा खेळ सतत सुरूच असतो त्यात ही अजाण राहून प्रवाही राहणे हे कसब बाईंच्या कवितेतून कायम शिकता आले. हा निरंतर वाहणारा कवितेचा प्रवाह कायमस्वरूपी मनामनात घर करून आहे. कधी आजीच्या मऊ रेशमी पैठणीत, कधी उंच आकाशी लुकलूकणाऱ्या, चमकणाऱ्या ताऱ्यात. संभाषणात. कधी तुमच्या माझ्या कवितेत.
- जुईली अतितकर
❤️❤️
ReplyDeleteधन्यवाद
Deleteफारच छान जुई, शांता शेळकेंची पुन्हा नव्याने ओळख झाली 🤗
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूप सुंदर जुई अप्रतिम लिहिले आहेस
ReplyDeleteधन्यवाद
Delete