२७. मनाचा कौल
कालच्या कळीचं आज सुंदर गुलाबी फुल झालेलं. दोन पानांच्या मध्ये आलेलं ते गुलाबाचे फुल पाहायला नेमकं तेव्हाच फुलपाखरू तिथं आलेलं. ते फुल तेव्हा वाटलं ठेवावं आपल्या डायरीत. त्याच्या गुलाबी पाकळ्यांचा स्पर्श माझ्या शब्दांना होण्याचा हाच एक उत्तम मार्ग होता. थोडा वेळ त्याकडे पाहिले. वाऱ्यावर डुलणारे फुल पाहताना मनात विचार आला.
कधी कधी काही गोष्टी आपल्याला इतक्या आवडतात. मनात घर करतात. त्या आणखी सुंदर करण्यासाठी, बदलण्यासाठी आपल मन सतत त्याचा मागोवा घेत असतं. हट्टाने त्यात बदल उतरवत असतो. आपण याला बदलून टाकू. आणखी चांगलं करून बघू . चेहरा मोहरा बदलताना आपण एक गोष्ट विसरून जातो का ? या फुलांकडे जे झाडावरचे सौंदर्य आधीच आहे त्यात त्याला अधिकचे सौंदर्य हवे आहे का ? ते फुलपाखरू तसे ही आलेच की वाट काढत, त्या फुलाला शोधत शोधत. त्याच्या रंगाला सुंगधाला शोधत. किती ही आकर्षक दिसले तरी कृत्रिम फुलावर फुलपाखरे तर येणार नाहीत, त्यासाठी त्यात लपलेला जिवंतपणा हवा असतो त्यांना. तो कोण देते याला ? लाल मातीत, हिरव्या पानात च तो खुलून येत असेल ना !
काही वेळा ठरवून तयार केलेले रस्ते आपल्याला रोमांचक वाटत नाहीत, जितकी नवी नवी शोधलेली पायवाट वाटू शकते. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. या वाटेवर आपण कोणाच्या तरी प्रवासात वाटसरू होतो, कोणी तरी आपल्या प्रवासात वाटसरू होते. अशा वेळी नव्या नव्या या पायवाटा ही नेहमीच्या होऊन जातात. त्या कच्च्या असतात पण पक्क्या रस्त्याला आणून सोडतात. पण त्याचा कच्चेपणा त्या सोडत नाहीत. पावला गणिक तयार होत जातात. पुढे वाट संपण्याची त्यांना भीती नसते. पुढे पुढे जात राहतात.
वाहणाऱ्या नदीला कोण बरे सांगत असेल अशी तशी ठराविक दिशेने वाहत जा? तिचे तिचे वळणा वळणाने वाहणे कित्येकाची तहान भागवतेच की. आपण तिला वाट न देता ती येते वाहत मीटर किलो मीटरच अंतर कापून आणि येतायेता वाटत जाते आनंद. तिला आपण स्वच्छ करायला जातो खरे पण तिचे अंतरंग स्वच्छ ठेवायची क्षमता तिच्यात उपजत च असते. आपण फक्त ते दूषित होऊ नये याची काळजी घ्यायची असते. तिचे वाहणे आपण ठरवले नाही तरी ती वाहणे सोडत नाही.
उंचच उंच डोंगरांची असते कुठे आखीव रेखीव दहा मजली वीस मजली बांधणी ? जशी आपण करत असतो आपल्या वसाहतीची रूपरेषा. त्याची नैसर्गिक भव्यता आपण आज ही गाठली कुठे ? तरी जगाचा पसारा, कोसळणारे पाणी, ढग आणि आकाश, पक्षाची घरटी सगळंच सामावून घेतलंय किती सहज !
वणवा लागलेल्या रानात जळलेल्या झाडाच्या राखेतून येतच की नवं झाड ? ते कुठे वाट पाहते कुणी येऊन मातीत रुजवण्याची ? काही गोष्टी निसर्गाच्या व्यवस्थापनात इतक्या छान जमून येतात. त्यातले सौंदर्य निराळे असते. त्यातली ऊर्जा वेगवेगळे रंग घेऊन आलेली असते. त्याचे जिवंतपण त्याने जपलेले असते.
हे जिवंतपण निसर्गाने दिलेल्या मनाचे ही असते. सारे सोपस्कार बाजूला ठेवून हाताने भरवलेला एक घास काटा चमच्याला जमेल का ? लहानपणी पडलेला पहिला वहीला दात आणि त्यांनतरची आपली स्माईल पुन्हा तशी दिसेल का ? तेव्हाचा फॅमिली फोटो आता पुन्हा येईल का ? स्माईल प्लिज म्हणता म्हणता निसर्गाने दिलेला आपल्या मनाचा जिवंतपणा आपण हरवला का ? त्या झाडावरच्या गुलाबाप्रमाणे तो तिथेच जपायला हवा जिथे त्याची ओढ आहे. म्हणून कदाचित ते फुल माझ्या डायरीत ठेवलं गेलं नाही, झाडावरच राहिलं पण लिहिता लिहिता त्याचा स्पर्श शब्दांना नक्कीच झाला.
- जुईली अतितकर
छान
ReplyDelete