२८. स्वप्नांच्या पलीकडे


गाढ झोपेत असताना असे होते ना कधी कधी. आपण एक प्रवासी होऊन जातो. चालता चालता आपण काल्पनिक जगात इतके रमून जातो की आपल्याला आपल्या गाढ झोपेचा ही विसर पडतो आणि या स्वप्नातल्या प्रवासाला लागतो. स्वप्न पडतात पारिजातकाच्या फुलांप्रमाणे, स्वप्ने पळतात वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगात. स्वप्ने दिसतात दूरच्या मृगजळा सारखी. स्वप्ने बोलतात मनातलं कधी तरी. स्वप्ने असतात सतत सोबत जिवलगाप्रमाणे.  सांगत असतात काही तरी. बोलणारी स्वप्न लक्षात राहतात कायमची. अरुंद वाट, खाच खळगे, वळणे आणि आडवळणे सारे सारे येतात स्वप्नात. या स्वप्नातल्या प्रवासात चालता चालता माझ्या पायाशी आलेला एकदा एक कागद. जुना, जीर्ण झालेला, दुमडून ठेवलेला. ओळखीचा. नजरचुकीने तो मागे गेला, पण पुढे चालता चालता त्याचा आपल्या पायाला झालेला स्पर्श विसरता आला नाही. मी मागे वळून पाहिले. कागद फार लांब नव्हता गेला. मागे जाऊन त्या कागदाची घडी उघडली.  उत्सुकतेने त्यातले वाचले ही. त्यात लिहिलेलं एक पत्र. ओळखीचे शब्द आणि अक्षर. थोडं वाचल्यावर कळलं ते मी लिहिलेलं पत्र होतं. काही वर्षांपूर्वी काही ठरवून, काही समजून, काही नवं नवं समोर ठेवून लिहिलेलं ते पत्र. 

पहिल्या ओळीवर लिहिलेलं " माझं स्वप्न " ते पत्र लिहिलेलं होतं मी माझ्या स्वप्नासाठी. लहानपणी पाहुणे, शिक्षक, जेष्ठ विचारतात ना " कोण होणार तू मोठं होऊन ? " तस काही तरी ते कोरे पान मला विचारते असं समजून मनातलं उतरवलेलं सारं त्या पानावर. ते पान माझ्याशी बोलू लागलं. मला समजवू लागलं " हे तुझं स्वप्न तुझ्या पायाशी आल आहे पहा. इसापनीतीच्या गोष्टी प्रमाणे गिरवत होतीस ना सतत. सांगत होतीस कौतुकाने. त्यात आणखी रंग भरत होतीस आणि हे पान भरत होतीस अक्षरानी, शब्दांनी, स्वप्नांनी ? जपून ठेवलेलं अचानक फाडून दूर केलेलं ते पत्र. ती छोटी, मोठी रंगवलेली स्वप्न आलीत ना परत तुझ्या जवळ. चाललीस कुठे पुढे त्यांना मागे टाकून ? आज तेच शब्द तीच स्वप्न बोलतात तुझ्याशी मित्र होऊन. ऐकतेस ना. "

तेव्हा केलेलंस दूर या कागदाला ते बर च केलंस. आता तो जेव्हा आलाय पुन्हा तुझ्याजवळ, तेव्हा या प्रवासात तो अनेकांच्या हातात गेला आहे. अनेकांच्या डोळ्यासमोरून गेला आहे. तुझे स्वप्न आता पुन्हा एकदा तुझ्याजवळ येताना, तो कागद तुला शोधत आला आहे. येता येता त्याने त्यातल एक स्वप्न पूर्ण केलं ही. त्या कागदाला आता वाचलं आहे. " माझं स्वप्न " हे वाचलं कित्येकांनी. समजले कित्येकांना. आता फक्त तुला च पुन्हा हे वाचायचं आहे. हरवलेली गोष्ट पुन्हा मिळाल्यावर आनंद होतोच पण स्वप्न हरवली तर ती माग  काढत येतात. रस्ता चुकतो, वेळ चुकते, दिशा चुकते पण हरवलेली स्वप्न पायाशी येतात. ती नेहमीच येतील असं ही नाही. ती येतात जेव्हा असंच एखादं कोरं पान भरल जातं मेहनतीने आणि निरंतर श्रद्धेने. म्हणून आज आलो तुझ्या वाटेवर  "

इतक्यात ते पान हातातून उडाले. पुन्हा एकदा दूर जाणार होते पण ते जाण्या आधीच मी झोपेतून उठले. कुठल्या डायरीत लिहिलेलं ती डायरी शोधू लागले. कुठल्या पानावर लिहिलेलं ते पान मिळालं. ते तसच होतं  डायरीत सांभाळून ठेवलेलं. ते शोधण्यासाठी मी जेव्हा मागची सगळी पान वाचली ना तेव्हा हातात आलं माझं हरवलेलं पान... 

पुढे पुढे चालताना मागून पाहणारी
माझा " आधार " झाली माझीच सावली 
कळण्यास कठीण ही गोष्ट सांगणारी
दिसली मला ही " आई " माझ्यातली

- जुईली अतितकर

Comments

  1. सुंदर लिहितेयस जुईली, लिहिती रहा.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद मॅडम ❣️

      Delete
  2. अतिशय हळव्या मनाची व्यक्तीच एव्हढ सुंदर लिहू शकते .... वाचून मनाला शांतता मिळाली .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

३१. माय मराठी

२५. मोत्यांची माळ

२६. जत्रा