३०. पत्रवाचन कट्टा
रविवार , ११ फेब्रुवारी , ठाण्यात पत्रवाचनाचा कट्टा होता. विषय प्रेम. बऱ्याचदा असे होते ना, आपल्यातला स्नेह भाव आणि प्रेम व्यक्त करणे कठीण होते. तेव्हा पत्र हे एक त्यावर चांगले सोल्युशन होऊ शकते. औपचारिकतेच्या चौकटीत न राहता दिलखुलासपणे ते व्यक्त करण्यासाठी, पोहोचवण्यासाठीचे माध्यम त्या दिवशी ही पत्र झालेले.
कधी कधी एकमेकाच्या प्रति आपल्या भावना बोथट झाल्यात असं ही आपल्याला वाटतं असतं. अशा वेळी कुठल्या तरी निमित्ताने , कुठला तरी दुवा बनून किंवा कुठल्या तरी माध्यमातून आपल्याला तशी संधी मिळते. तेव्हा त्या चौकटीच्या बाहेर येऊन आपण बोलू लागतो, पत्रातून लिहू लागतो.
त्या दिवशी पत्राच्या माध्यमातून माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनी पत्र वाचले, पोहोचवले. या कट्ट्याला उपस्थित मान्यवर लेखकांनी ही त्यांच्या भावना पत्रातून आम्हा तरुणांपर्यन्त पोहोचवल्या. प्रा. प्रज्ञा पंडित, श्री. सुनील शिरसाठ, श्री. राजेंद्र गोसावी, श्री. रामदास खरे यांच्या सोबत पत्राचा विषय वेगवेगळ्या दृष्टीकोनातून समोर आला. बागेत जमलेला हा कट्टा एकमेकांच्या संवादातून, गप्पा मारत, एकमेकांना प्रोत्साहन देत, गाणी म्हणत यशस्वी झाला. हरवलेला संवाद पुन्हा साधण्यासाठी एक जागा, एक पत्र आणि कट्टा पुरेसा होता.
या कट्ट्यासाठी आवर्जून पत्र ऐकण्यासाठी आलेले डोंबिवलीतले काका आनंद दातार यांनी माझ्या लिखाणावर दाद म्हणून " अक्षरांच्या कविता " हे छानसे पुस्तक भेट म्हणून दिले. या कट्ट्यासाठी जमलेले सर्व मित्र मैत्रिणी , दीपा मॅडम यांच्यासोबतच्या गप्पा, काढलेला सेल्फी आणि मिळालेलं पुस्तक आणि पुढच्या वाटचालीसाठी गरजेची असलेली प्रचंड ऊर्जा या आणि अशा अनेक छोट्या छोट्या अनुभवातून त्या दिवशी प्रेम कळत गेले. प्रेम विषय त्यातूनच आपसूक व्यापक होत गेला.
- जुई
Comments
Post a Comment