२९. प्रेमाचं पत्र
माझी जवळची मैत्रीण
प्रिय आई...
हे पत्र लिहायला सुरुवात केली, मी पत्रात प्रेम शोधत गेले आणि तिथे आपोआप तुझं माझं नातं मला दिसू लागलं. जन्माची चाहूल लागताच जर कुठलं प्रेमाचा वर्षाव करणार नातं आपल्याशी बांधलं जात असेल ना तर ते आईचे नाते. माझ्याशी जोडले गेलेले हेच ते माझ्या आयुष्यात आलेले पहिले वहिले प्रेमाचे नाते. तुझे माझे नाते. चालता चालता अचानक लहान मुल रस्त्यात ठेचकाळतं ना, पडतं, रडतं, तिथे च थांबतं. त्या त्या वेळी तू होतीस. तुझ्या हातात माझी मूठ घट्ट पकडलेली. जवळ घेऊन जेव्हा जेव्हा घट्ट मिठी मारलीस ना तेव्हा त्या दुखल्या खुपल्याचा आपसूक विसर पडला. तुझी प्रेमाची फुंकर आज ही बऱ्याचशा जखमांवर औषध होते, आई.
लहानपणी कुठे कळतं प्रेम म्हणजे नक्की काय ? हळूहळू कळणारा प्रेमाचा अर्थ म्हणजे फक्त आठवते तेव्हाची ती फुंकर आणि मिठी. आपल्या नात्याला जपणारी ती फुंकर नाउमेदीच्या दिवसात ही मला उमेदीने पुढे जायला शिकवते.
जाणते होत असताना, नवे मार्ग मोकळे होत असताना बरेचदा आपल्या पंखात बळ येते. तेव्हा मायेचा पिंजरा ही आपल्या मनात असतो, जो अडसर होऊ शकतो. अशा वेळी मोकळे आकाश दाखवणारे तुझे हात माझ्या मागे सावलीसारखे होते. तू एकदा मला कवयित्री शांता शेळके बाईंनी लिहिलेली कविता वाचून दाखवलेलीस ... तेव्हा म्हणलेलीस " निसर्गतः आपल्यात काही गोष्टी रुजवल्या जातात तसेच हे प्रेम "
ती कविता मला आज हे पत्र लिहिताना ही आठवतेय,
सहज फुलू द्यावे फुल,
सहज दरवळावा वास
अधिक काही मिळवण्याचा
करू नये अट्टाहास
सुवास, पाकळ्या, पराग, देठे
फुल इतकीच देते ग्वाही
अलग अलग करू जाता
हाती काहीच उरत नाही
प्रेम हे एकमेकांना बांधून ठेवणार नात. आणि ते इतकं सहज कळी फुलात झिरपत गेले. सभोवती पाहिले ना , की कधी कधी मनात जपलेले ते प्रेम दिसू ही लागते. कधी वाटेत, कधी वळणावर... "
तू तेव्हा सांगितलेली ती गोष्ट आज ही माझ्या वाटा, वळणे सुंदर करते. "
प्रेम म्हटले, की जपणे हे शिकवणारी तू माझी पहिली गुरू झालीस. आज इतक्या वर्षांनी जेव्हा मी तुला तुझ्या आवडीच्या गाण्याच्या ओळी म्हणताना पाहते ना, तेव्हा मला त्याची व्याप्ती कळते. तुझ्या माझ्यातल्या नात्याला पूर्ण करणारी एक कविता माझ्या वाचनात आली...कविता अशी होती.
झाकले दरवाजे असता आत कोण घेत
कोण जाणे त्या कळ्यांना रंग कोण देत
काय रंग असेल कळीचा रोपटयाला नाही ठाव
रोप उगाच बहरून येत आणते माहीत असल्याचा आव
एक खंत आहे कळीला स्वतः ला पाहता येत नाही
जन्म देणार झाड स्वतः कळीला जवळ घेत नाही
एक इवली कळी फुलताना ते झाड तु झालीस. आजवर जमवलेलं मिळवलेलं सगळं दिलंस त्या फुलणार्या कळीला.
कळीला फुलताना ती स्वतः पाहू शकत नाही. पण तू जवळून पाहिलेस. ओळखलंस.
मला तू नेहमी सांगतेस, " हे प्रेमाचे फुल असतं आपल्या मनात. जे प्रेम तुला मिळाले त्याला मात्र मनाच्या कोपऱ्यात जपून ठेव. " आई , जसे मला आधार देणारे एक झाड तू झालीस, कधी जखमांवरची फुंकर तू झालीस. तशी एक फुंकर आणि तसे सांभाळणारे झाड मला व्हायचंय आणि इथल्यासोबत दुसऱ्या ही अंगणात बहरून यायचय....
तुझी जुई
सुंदर लेख
ReplyDeleteThanks ❣️
Delete