३३.आवाज


आवाज ... पक्षांचे किलबिल आवाज, गजराचे आवाज, भोवतालच्या गोंगाटात हरवलेले आवाज, याचना करणारे आवाज, काळजाला हात घालणारे आवाज, कान उघडणारे आवाज, कधी सुई सारखे टोचणारे आवाज तर कधी कानावाटे मनाला मृदू स्पर्श करणारे आवाज. आवाजावर लिहिताना मनात काही प्रश्न आहेत ? ऐकणारे कान फारसे मिळत नाही,  सांगणारे वेगवेगळे आवाज असतात. रोज एवढे कानावर आदळणारे आवाज बंद झालेच तर ...


आवाजात काय जादू असावी की त्याचे विस्मरण होत नाही.  कधी कधी ती व्यक्ती किंवा अन्य गोष्ट समोर नसली तरी आवाज मात्र कायम लक्षात राहतो. साद प्रतिसादाचे गणित त्यातून सहज सुटते. कधी कधी आवाज टोकदार, कर्कश किंवा नकोसे वाटतात. बोलणे, सांगणे आणि संवाद यांच्यातला फरक आवाजाने सहज कळतो. 


कधी कधी माझ्या बाबतीत ही असे होते. एखादी कविता लिहिता लिहिता सहज सुचते आणि पूर्ण ही होते, पण ती म्हणताना शब्दांचा अर्थ मनापर्यंत पोहोचवण्यासाठी हे आवाजाचे तरंगणारे तराफे सोबत ठेवावेच लागतात. काही रचना मनात घर करतात पण खूपदा ते घर आवाजाच्या पायावर उभारलेले असते. प्रेम, माया, उत्कटता ही मनाची आंदोलने सरळ रेषेत म्हणली तर शब्द वाया ही जातात. त्यांना ऐकणारे कान शोधायचे असतील तर गोंगाटात ही हा आवाज शोधता यायला हवा. आवाजावरून शब्दांचा अर्थ कळू शकतो. माणसाचे मन कळू शकते, स्वभाव कळू शकतो. माणूस कळू शकतो. आपल्या भोवतालचे आवाज आपल्याला बदलत असतात. घडवत असतात. तेव्हा हे आवाज शोधण्यासाठी एकदा तरी प्रयत्न करायला हवेत. 


समुद्राची गाज का आपल्या खोल मनात साठून राहते ?  सळसळणारा वारा का आपला मित्र होतो ? पक्षांचा किलबिलाट का आपली सकाळ सुंदर करतो ? एकटे असताना अचानक आलेली हाक का आपल्याला धीर देते ? आवाजाशी सारेच बांधले गेलेले आहे. कुणी आवाजात रमतो . कुणी आवाजाला निवडतो. कुणी आवाजावर प्रेम करतो. कुणासाठी ती प्रेरणा असते तर कुणासाठी फक्त आठवण. कुणासाठी सुख तर कुणासाठी फुंकर. शांतता ही जर वादळापूर्वीची असेल तर ते वादळ थोपवण्याची, परतवून लावण्याची ताकद आवाजातच आहे ना, आवाज एक जोडण्याचे साधन होऊ शकते म्हणून आवाजाच्या प्रेमात पडायला हवं. कधी तरी कुणाचा तरी आवाज होऊन काळजाला भिडायला हवं. 


- ©®जुईली अतितकर

Comments

Popular posts from this blog

३१. माय मराठी

२५. मोत्यांची माळ

२६. जत्रा