३६. फांदी
घराच्या मागे आलेल्या आंब्याच्या झाडाशी तेव्हा माझा कायम जिव्हाळ्याचा संबध असायचा. खेळण्या बागडण्यासाठी त्याच्या फांद्या पुरेशा असायच्या. आकाशाला गवसणी घालणाऱ्या त्याच्या फांद्या पकडण्यासाठी कायम चढाओढ असायची. त्या झाडाच्या अगदी जवळ वडाच्या झाडाने आपलं बस्तान मांडले होते. आंबाच्या झाडासोबत पाठच्या भावासारखे ते ही डेरेदार वाढत होते.
एक दिवस खेळता खेळता आंब्याच्या झाडाची एक फांदी तुटली. त्या फांदीला आलेले पिटुकले आंबे ही जमिनीवर पडले आणि त्यावरचे घरटे ही तसेच जमिनीवर आले. तेव्हा ती तुटलेली फांदी पाहून वाटले तात्काळ त्या घरट्याचे आणि आंब्याचे विश्व संपुन गेले. माझ्या हातातली तुटलेली फांदी आजीने घेतली, त्याला आलेले आंबे काढून धुवून गवतात ठेवले. आंबे लहान होते तरी काही दिवसांनी त्यांच्यात आपोआप गोडवा आला. खाली आलेले घरटे उचलून आजीने कुंपणावर ठेवले. त्यात वाटीभर पाणी ठेवल्यावर आपोआप त्यात चिवचिवाट सुरू झाला.
क्षणभर थांबलेले विश्व पुन्हा पूर्ववत झाले. फांदीचे तुटून वेगळे होणे जरी अनिश्चित होते तरी तिथे नवीन फांदी येणे हे निश्चित होते.
काही दिवसांनी कुंपणावर आलेल्या चिमण्यांचा आवाज सकाळी जागे करू लागला. खिडकीशी येऊन उठवून जाऊ लागला. बाजूला वाढणाऱ्या वडाच्या फांद्यांनी आंब्याच्या झाडात आपलं ही जाळे पसरवले होते. एका फांदीला आधार देत दुसरी फांदी येत होती. वडाचे आणि आंब्याचे झाड इतके एकमेकांत मिसळून गेले की एकच वाटू लागले.
खर तर फांदी तुटल्याचे दुःख आता लहान झालेले. कारण आकाशाला गवसणी घालणारे झाड मोठे झालेले.
पहा ना, आपली मुळे जरी दूर असली तरी फांदीला आधार असतो मातीचा. मातीशी असलेले फांदीचे नाते न तुटणारे असते. म्हणून च का झाडावरून वेगळी झाली तरी मातीत रुजून येते. पुन्हा नव्याने फुलून येते. तिला आपला ठरलेला आकार, उकार नसतो, तर असते ते फक्त आकाशाकडे पाहत वाढत असताना मातीशी बांधले गेलेले नाते. मातीशी असलेली ओढ.
वाढत गेलेल्या शाखा जरी वर वर जाताना साऱ्या जगाने पाहिले तरी त्याला धरून ठेवणारी माती त्यात जिवंतपणा जपत असते.
आपले ही विश्व कधी कधी असेच असते वाढत जाणाऱ्या फांदीप्रमाणे. कधी वाऱ्यावर झुळणारे, पानाफुलांनी फुलणारे, घरट्याचे आधार. मैत्रीतल्या खांद्याप्रमाणे, तुटलेच तर मातीमधून नव्याने येणाऱ्या झाडाच्या फांदीप्रमाणे.
हो ना ...
- ©®जुईली अतितकर
लेख वाचताना त्यात रमून गेलो फारच सुंदर लिखाण कायम स्मरणात राहील
ReplyDeleteधन्यवाद ❣️
Delete