३७. मागे सोडलेले शहर
नव्या प्रवासाचा आनंद आणि नव्या ठिकाणच्या आठवणी तयार करायला कोणाला नाही आवडत ? नव्या गावा जाताना आपण एक गोष्ट मनात कायम साठवून ठेवतो. ते म्हणजे मागे सोडलेले शहर. तोच प्रवास दूरचा आणि बऱ्याच दिवसांचा असेल तर त्या मागे राहिलेल्या शहराची जागा ट्रंकेत ठेवलेल्या मौल्यवान खजिन्यासारखी आपल्या मनात राहते. तिथले रस्ते, चौक, तिथल्या इमारतीची नाव, दुकानांची नावे सगळ्याच आपल्यासाठी महत्वाच्या खुणा होऊन जातात. अगदी साधी चहाची टपरी सुद्धा तेव्हा आपल्याला त्या काळात घेऊन जाते.
आपण दूरच्या प्रवासाला निघतो तेव्हा खर तर या मागे सोडलेल्या शहराची आपल्याला वर्षानुवर्षे मिळालेली सोबत आठवते. आपल्या कुटुंबाला कुशीत घेणारे ते शहर आपला जिव्हाळ्याचा विषय होऊन जातो. ते शहर जरी आपल्याला विसरले तरी त्या शहराला आपण कधीच विसरत नाही आणि त्या शहरासाठी एक पत्र लिहावे असं कुठे तरी वाटून जातं.
माझ्या शहरासाठी लिहिलेलं हे पत्र, शहरातल्या आठवणी.
मी जसे म्हणले, हे शहर माझ्यासाठी ट्रंकेतला खजिना आहे. जो पुढच्या पाच दहा वर्षांनी मी पुन्हा खोलून पहिला तरी तो तेव्हा ही तसाच असणार. काळ बदलला असेल, पण काही ठिकाणे तशीच असतील. माझ्या आजवरच्या आठवणी घेऊन. शाळेत जाण्याचा रस्ता, रस्त्याला बिलगून असलेले तळे, कॉलेजला जाण्याचा रस्ता, रस्त्यात लागणारी बैठे चाळीची रांग, माझ्या घराकडे जाणारा रस्ता, घराजवळच्या पार्कात जाणारा रस्ता. त्या रस्त्याजवळची फेसम वडापावची गाडी, तिथली कायमच दिसणारी गर्दी, वडाळे तलावाच्या बाजूने जाणारा रस्ता, तळ्यावरच्या गप्पा, तिथला सूर्यास्त.
बरेचदा एखादी वास्तू, एखादी व्यक्ती आपल्या लक्षात असते, पण कधी कधी त्या शहरातले रस्ते मला जास्त बोलके वाटतात. ते कधी ही आपल्याला भूतकाळात घेऊन जाऊ शकतात. त्या सर्व लक्षात ठेवलेल्या ठिकाणी त्या व्यक्ती कडे जाणारे रस्ते सहज आपल्याला भावनिक करून जातात. दूर जाण्यासाठी जसे ते सेतू बनतात तसेच परतण्याची संधी ही तेच देतात. त्या शहराला आपल्याशी जोडण्याचे काम हे रस्ते करत असतात. एक साधा रस्ता आपल्या मनापर्यंत आपल्याला पोहोचवतो. शहर सुटले तरी मनातून त्या शहराकडे जाणाऱ्या वाटा कायम बोलवत असतात.
ते शहर सोडल्यानंतर आज त्याविषयी लिहिताना वाटते की ते शहर मागे सोडले नाहीच, मी ते सोबत घेऊन आले. हजार किलोमीटरचे अंतर पार करून. माझ्यासोबत. आज या शहरात मी ते शहर शोधते. इथल्या रस्त्यावर चालताना ते मला सापडते ही. अंतर आपोआप कमी होते. मी ते रोज पाहते. माझे ते शहर, तिथला माझ्या घराकडे नेणारा रस्ता, इथे ही घरी परतताना मला माझ्या त्या शहराची आठवण करून देतो. पनवेलची आठवण करून देतो.
- जुई❣️
मस्त
ReplyDeleteधन्यवाद
Delete