३८. शंभू राजा

आदरणीय शंभू राजा,  

आजच्या घडीला आधुनिक जगात वावरणारा मी तुझा एक सामान्य मावळा, पुन्हा एकदा मी तुला मोठ्या पडद्यावर पाहून आलो. छत्रपतींचे स्वराज्य पुन्हा एकदा पाहून आलो. तू आलास माझ्या स्वप्नात आणि मला खुद्द विचारलेस, तू काय काय पाहिलेस रे ? 

माझा कागद समोर तयार होता, भरभर लिहू लागलो, 
" आईची माया, वडिलांची छत्र छाया काय असते ?  स्वराज्यासाठी स्वेच्छेने जमलेली रयत. स्वातंत्र्यासाठी बांधलेली मूठ पाहून आलो. रयतेतल्या हर एक मावळ्यांनी रचलेला स्वतःचा एक इतिहास, मोहरापेक्षा ही मौल्यवान वाटावे एवढे प्रगल्भ बोलणे. हत्यार नसताना बुद्धीने लढण्याचा गनिमी कावा,  सारे सारे वैभव जपण्यासाठी उभारलेली दगडी विश्वासू तटबंदी तसेच विश्वासू मंत्री मंडळ, प्रजेला समर्पित झालेल्या राजाचा तो इतिहास...

काय काय पाहून आलो याचा विचार केला आणि  आठवलं तुझ्या साऱ्या जखमांवर हळहळणारे, पहिल्या रांगेत बसलेले ते आजी आजोबा, ज्यांनी इतिहास त्या वेळी पाहता पाहता जगून ही घेतला. " जय भवानी " चा नारा देणारे, तुला पाहायला आलेले पिटुकले हात पाहिले, तुला जखमा होताना त्यांचे ही हात कापत होते. कापणाऱ्या त्या हातांना धीर देणारे ही हात पाहिले. शेजारी बसलेल्या माझ्या लहान बहिणीने वडिलांची घट्ट मूठ पकडली तेव्हा तिच्या मनात उठलेले प्रश्नांचे वादळ पाहिले. बंद मुठीत सामावलेली आई भवानीची शक्ती पाहिली. शेवटी शेवटी युद्ध संपले. तू लढला गनिमांशी, फितूर झालेल्या आपल्या ही काही माणसांशी, फसलेल्या नियतीशी. लढला पण हार मानली नाही तेव्हा तुझ्या हातातल्या तलवारी पेक्षा तीक्ष्ण असलेले मनगटाचे बळ पाहिले. आमच्या हाती तलवार दिलीच तर ती पेलण्याचे बळ आमच्यात कुठून येणार ?  ते तुझ्या डोळ्यात दिसले, तुझ्या बुद्धिच्या बळात दिसले, असे लढणारे हात, बलाढ्य मन पाहून आलो. मातीशी इमान, स्वराज्याची शान आणि संपुर्ण जगाला हेवा वाटेल असा रुपेरी पडद्यावर साकारलेला सोनेरी जरीसारखा आपला मराठमोळा इतिहास पाहून आलो. मी पुन्हा एकदा तुला पाहून आलो. एवढे सगळे पाहून आलो ... 

आपलाच शाळेत जाणारा , सातवी - अ मध्ये शिकणारा एक मावळा 

हे पत्र लिहिताना त्या प्रत्येक वर्गातल्या मुलाची मला आठवण होते ज्यांनी वास्तविक जगात जन्माला आलेल्या या सुपर हिरोला पडद्यावर नुसते पाहिले नाही तर पुस्तकात वाचले आणि आपल्या मातीचे ऋण कायम स्मरणात ठेवले. 


- जुईली अतितकर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

३१. माय मराठी

२५. मोत्यांची माळ

२६. जत्रा