४१.वाचणे
आपल्या आजूबाजूला तऱ्हे तऱ्हेचे लोक वावरत असतात. काहींना सवय असते आपले अनुभव कोणा ना कोणाला सांगायची. आपला आनंद कोणासोबत तरी वाटून घेण्याची.
आपल्या अडचणी, आपले दुःख कोणासोबत तरी share करण्याची. प्रत्येकाच्या वेगळ्या पद्धती, वेगळी माणसे, वेगळे पुस्तक.एकदा एका मुलीने मला प्रश्न विचारला " आपल्या मनातल्या गोष्टी प्रत्येक वेळी कोणाला तरी सांगणे गरजेच असतं का ? " कॉलेज वयीन मुलीचा तो प्रश्न खरं तर फार महत्वाचा होता. तेव्हा तिला थोडक्यात सांगावे म्हणून एक उदाहरण दिले " आपल्या मनातल्या गोष्टी कधी कधी आपल्यासाठी फार महत्वाच्या होतात. कधी त्या चुकीच्या की बरोबर हे आपल्याला ही कळत नाही. आपल्याला कळत नसेल तर त्या योग्य व्यक्तीला सांगणे गरजेचे असते. कधी कधी काही गोष्टींची आपल्याला निवड करावी लागते. कधी आपले अंदाज चुकू शकतात अशा वेळी मनातलं द्वंद्व अशा ठिकाणी रिते करते योग्य ठरते, जिथे त्याला उत्तर मिळेल, दिशा मिळेल. "
जसं की समजा आपल्याला एखादे गणित सुटत नसेल आणि त्याचे उत्तर हवेच आहे, तर ते आपण उत्तर इतिहासाच्या पुस्तकात शोधले तर उत्तर मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला गणिताचे पुस्तक च शोधावे लागेल. अशा वेळी ते पुस्तक मिळविणे ही महत्वाचे असते. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा फक्त सांगण्यातला आनंद आपल्याला हवा असतो आणि तो आनंद समोरच्याला ही तितक्याच आतुरतेने पाहायचा असतो, तेव्हा आपण तो सहज मिळवू शकतो. जसे जसे आपण मोठे होत जातो. अनुभवाने समृद्ध होत जातो, तेव्हा आपल्याला भेटलेल्या प्रत्येकाचे विचार प्रवाह कळत जातात, स्वभाव कळत जातो. गणित आणि इतिहास यातला फरक, व्यक्ती व्यक्ती मधला फरक कळत जातो.
आपल्या जवळची ती एक व्यक्ती आपले अडलेले गणित समजू शकते. सोडवू शकते. अशी व्यक्ती शोधणे आणि भेटणे सोपे होते जेव्हा आपण संवाद साधतो. Sharing and caring चं हे circle तेव्हा पूर्ण होत जेव्हा एकाला गणित अडलेले असते, ते सोडवायचे असते आणि दुसऱ्याला ते माहिती असते आणि ते सांगायचे असते. योग्य वेळी योग्य पुस्तक मिळणं ... योग्य वेळी योग्य व्यक्ती मिळणे आणि ती ओळखणे. हे जमवणे कधी कधी कठीण ही होते. म्हणून च एक वेळ अशी येते की, आपले अडलेले गणित आपण कधी कधी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे सोडून देतो किंवा दुसऱ्याच पुस्तकात ते शोधत राहतो. हळूहळू ते अर्धवट सोडवलेले गणित तसे च ठेवून आपण पुढचे पान उलटतो. त्यामुळे आपल्या मनातलं सांगणे म्हणजे हे अर्धवट सोडवलेले गणित च, जे प्रत्येकाला जमेल च असे नाही. त्यासाठी तशीच व्यक्ती आपल्या आयुष्यात असणे गरजेचे आहे. तसे पुस्तक आपल्या हाती लागणे गरजेचे आहे. आणि ते येण्यासाठी आधी एक पुस्तक ... एक व्यक्ती मनापासून वाचावी लागते. हो ना...
- जुईली अतितकर
Comments
Post a Comment