४३. ती असते ...

" ती घरीच असते " दोघातले संभाषण तिच्यासाठी, तिच्याबद्दल किंवा अशा असंख्य गृहिणींना. गृहिणी हा शब्द त्यातल्या त्यात वरच्या वर्गातला. ती नक्की कशी असते? ती काय करते ? ती कशी सांभाळते ? हे तिच्या जागी आपण येतो तेव्हा कळते. तिचे घरीच असणे कुणा कुणासाठी खुप काही असते. त्यावर हे लिहिलेलं पत्र. तिच्यासाठी. 

जाणते झाल्यावर आपण हळूहळू कमावते होतो. बाहेरचे आकर्षक ,आभासी विश्व आपल्याला खुणावत असते. स्वतंत्र विचार आपल्याला झपाटून टाकत असतात. वेगवेगळी प्रलोभने समोर येत असतात. बाहेरच्या अनुभवांनी आपण समृद्ध होत असताना आपली वाट पाहणारी ती घरीच असते. वेगवेगळे मुखवटे लावून जगाला सामोरे जाताना आपण दुखावले जातो. फसतो आणि फसवतो. पण या मुखवट्या मागची दमछाक पाहणारी ती आपली घरी वाट पाहत असते.

खूप काही मनात असते, कोणाकडे तरी ही तगमग रिती करायची असते, ऐकणारे कोणी तरी हवे असते तेव्हा आपल्या मृदू स्पर्शाने हे वादळ शांत करणारी ती घरीच असते. तिथे ती नसेल तर...

ती घरी असते, तेव्हा एक छत आणि भिंती बोलू लागतात, हसू लागतात, आनंदी होतात. ती घरी नसलेले घर सुद्धा तिची वाट पाहत असते. ते घर तिच्या असण्यातला मायेचा ओलावा शोधत असते. 

आपण वाढत जाणाऱ्या नात्यातल्या कोरडेपणावर बरेचदा ऐकतो. हा तिच्या घरी नसण्यातला कोरडेपणा तर नाही ना ? घराला प्रेमाने बांधणारी ती जर गृहीत धरली जात असेल तर ती घराबाहेर पडून स्वतः ला सिद्ध करण्याच्या वाटा शोधते. 

सध्या वाढत जाणारी विभक्त कुटुंब पद्धती, वाढते घटस्फोटाचे प्रमाण, तरुणांमध्ये वाढलेले लग्नाचे वय हे सगळे त्याचे परिणाम असूही शकतात.

आज ज्या मैत्रिणी घर आणि बाहेरचे जग दोन्ही सांभाळतायत त्यांचे कौतुक आहेच पण त्यांची होणारी दमछाक दुर्लक्षित होते का ? या परिस्थितीला जबाबदार कोण ? आपले विचार की अविचार ... 

माझ्या बालपणी ती घरी होती... माझी आई ... म्हणून मी पहिल्यांदा म्हणलेली " आई " ही हाक तिने ऐकली. पडता पडता उभे राहताना, धावताना तिने पाहिले. माझ्या ही नकळत माझ्या मनातले जाणून घेण्यासाठी ती जवळ आहे. हे आता खूप मोठे वाटू लागले आहे. तिचे समर्पण आणि तिचा संयम तिने घरच्या चार भिंतीत शिकवला.  आज चित्र वेगळे आहे " ती घराबाहेर जाते, स्वतःला सिद्ध करते. तिने स्वतःला झोकून दिले, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी, त्यामागे आपण जबाबदार असू ही शकतो. "  इतिहासात डोकावून पाहिले की वाटते जिजाबाईंचे समर्पण आपण विसरत नाही ना त्यांनीही तेच केले जे एक गृहिणी करते, एका राजाला घडवले.   शिवरायांना घडवणाऱ्या जिजाबाई त्याच्या जवळ नसत्या तर .... 

कधी कधी वाटते, तिच्या घरी असण्याला ही तेवढाच अर्थ आहे, ती घरीच असते तेव्हा आपल्या माघारी घर आपली वाट पाहते... कोणीतरी घरी असते हे ही खूप असते...

सगळे काही तिच्यासाठी ...


- जुई


Comments

  1. आई ची थोरवी आणि महिमा, वर्णूच शकणं कठीण.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

३१. माय मराठी

२५. मोत्यांची माळ

२६. जत्रा